राज्यभरात पावसाचा जोर कायम; अनेक जिल्ह्यात ढगफुटी, वाचा एका क्लिकवर कुठं काय स्थिती?

मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना.

  • Written By: Published:
Rain

गेली पंधरा दिवसांपासून पुराने झोडपलेल्या मराठवाड्यावर आता पुन्हा एकदा आभाळ फाटल्याचं चित्र आहे. (Rain) सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. अशातच आता अनेक ठिकाणच्या धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आल्याने पुन्हा एकदा धाकधूक वाढली आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाला अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई

मुंबईच्या पश्चिम उपनगरात रविवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास अनेक भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

गोदावरी

दक्षिणेची गंगा आणि भारतातील दुसरी सर्वात लांब नदी असलेल्या गोदावरी नदीला सध्या महापूर आला आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधून या नदीचा उगम होतो. पुढे ही नदी छत्रपती संभाजीगर आणि नांदेड जिल्ह्यातून तेलंगणात जाते.

मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, शेतमजूर व कामगारांना मदत करा

या नदीचं उगमस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यात दरवर्षी जोरदार पाऊस होतो. त्याच पाण्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात पाणीसाठा जमा होतो. मात्र, सध्या राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे. त्यातच नाशिकमध्ये झालेल्या पावसाने गोदावरीला पूर आला आहे. पुढे संभाजीनगरमध्येही पाऊस सुरू झाल्यानं गोदावरीच्या पाण्यात मोठी वाढ झाली असून जायकवाडी पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाचे 27दरवाजे उघडण्यात आलेत. पुढे नांदेड जिल्ह्यातही पाऊस सुरू असल्यानं तिथंही गोदावरी नदी दुधडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांमधील शेतांमध्ये पाणी साचलं आहे.

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जायकवाडी धरणातून सध्या 1 लाख 98 हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरणाच्या 18 नियमित आणि 9 आपत्कालीन दरवाजातून विसर्ग सुरू असून गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक

नाशिकच्या मनमाड शहर आणि परिसरात शनिवारी रात्रीपासून पावसाने अक्षरशः कहर केला. पावसामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या पांझण आणि राम गुळणा नदीला या मोसमातील सर्वात मोठा पूर आलाय. नदीकाठच्या गुरुद्वाऱ्यामागील वस्ती, गवळी वाडा, ईदगाह, टक्कार मोहल्ला या भागातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे घरातील अन्न धान्य आणि संसारोपयोगी वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. प्रशासनाने तसंच या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. त्यांचे संसारोपयोगी साहित्यही सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.

पालघर

पालघरमध्ये सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडले आहेत. धामणी आणि कवडास धरणातून सूर्या नदीत 47 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 100 टक्के भरलं. तर कवडास धरण ओवर फ्लो आहे. या धरणांमधून सूर्या नदीत सुरू असलेल्या विसर्गामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. त्यामुळे सूर्या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रायगड

रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी दक्षिण भागात तर रविवारी रायगडच्या उत्तर भागात पावसाचा जोर वाढल्याचं पहायला मिळालं. कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नगरपालिका परिसरामध्ये पाणी साचल्याचं पहायला मिळालं. तर उल्हास नदीच्या पातळीतही मोठी वाढ झाली आहे.

अहिल्यागर

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडण्याचं धाडस करणं अंगलट आल्याचं समोर आलं. पावसामुळे सूर्यकांता नदीला पूर आलाय. या पुरामुळे नदीच्या पुलावरुन पाणी वाहतंय. अशातच एका कार चालकाने नसतं धाडस करुन पाण्यातून चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अंतरावर गेल्यावर रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडाली. पाण्याचा जोर वाढल्याने ते कसेबसे गाडीच्या छतावर चढले. यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, मात्र फॉरच्युनर कार अद्याप पाण्यातच उभी आहे. दरम्यान शेवगाव तालुक्याचा संपर्क तुटला असून शेवगावला येणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

बीड

बीड आणि हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं पीक पाण्यात गेलं. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. सोयाबीनचे पीक दसरा दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हाती लागते होते. परंतु या पुरामुळे सोयाबीन पीक पूर्ण नष्ट झालं आहे. आता पीक वाया गेल्यानं आता मुलांच्या शाळेची फी कशी भरणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

परभणी

परभणी जिल्ह्यातील गोदावरी, पूर्णा आणि दुधना या तिन्ही नद्यांना पूर आलाय. येलदरी धरणाच्या 10 दरवाज्यामधून पूर्णा नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पावसानं थैमान घातलं होतं.. आज सकाळपासून धाराशिव जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली मात्र नद्यांची पूरस्थिती कायम आहे. नदीकाठच्या शेत शिवारात पाणी अजूनही ओसरलेलं नाही. धाराशिवच्या तेरणा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. तेरणा नदी काठच्या गावांमध्ये आतापर्यंत तीन वेळा पूरस्थिती निर्माण झाली होती. आता देखील मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्यानं पाडोळी गावातील नागरिकांचं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थलांतर सुरू आहे.

जळगाव

जळगाव जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणाच्या माणिकपुंज प्रकल्पात पाण्याची मोठी वाढ झाली आहे. मन्याड धरणावरील माणिकपूंज प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

यवतमाळ

यवतमाळच्या आर्णी शहराला अरुणावती नदीच्या पुराचा फटका बसला असून अनेक नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरलं आहे. पुराचं पाणी शिरल्याने नागरिकाचे जीवनाशक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आहे. शनिवारी रात्री आलेल्या पुरामुळे आर्णी शहरातील मोबीनपुरा, शास्त्री नगर आणि झोपडपट्टी परिसराला पुराचा फटका बसला. सध्या पूर ओसरला असला तरी काही भागात अजूनही पुराचे पाणी साचलेलं आहे.

follow us