भाजपने आमचा पाठिंबा गृहीत धरू नये; मंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला सूचक इशारा

शिवसेना-भाजप यांच्यातील राजकीय समीकरणांवर चर्चा रंगली असताना, शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.

  • Written By: Published:
Untitled Design 32

Minister Shambhuraj Desai’s telling warning to BJP : सांगली जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील राजकीय समीकरणांवर चर्चा रंगली असताना, शिवसेनेचे नेते व जिल्हा संपर्कप्रमुख शंभूराज देसाई यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने घेतलेल्या सोयीस्कर भूमिकेचा विचार करता, जिल्हा परिषद सत्तेबाबतचा निर्णय आम्ही स्वतंत्रपणे घेऊ, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

देसाई म्हणाले की, जिल्हा परिषद सत्तास्थापनेबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. भाजपने आमचा पाठिंबा गृहीत धरणे योग्य नाही. आम्ही स्वतंत्र लढलो आहोत. आमचा निर्णय आम्हीच घेणार, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. सांगली येथे शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाच्या नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महापालिका निवडणुकीतील अनुभव उलगडला. महापालिका निवडणुकीत भाजपने सुरुवातीला 10 जागा देण्याचे जाहीर केले; मात्र शेवटी ‘सॉरी’ म्हणत फक्त दोन जागांची ऑफर दिली. ‘एका लुगड्याने बाई म्हातारी होत नसते’ हे निकालानंतर भाजपला उमगले. अती तिथे माती झाली, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मराठी मुंबईचा सामाजिक समतोल बिघडला…, मुख्यमंत्र्यांनी भाजपचा महापौर मुंबईवर लादल्याचा शिवसेनेचा आरोप

त्यांनी पुढे सांगितले की, सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू असताना भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना सोबत घेतले. हा पक्षही महायुतीचा घटक असल्याने आम्हाला हरकत नाही; मात्र महायुतीच्या कोअर कमिटी बैठकीत नगरपालिका व महापालिका निवडणुकीत टोकाची भूमिका घेऊ नये, असा निर्णय झाला होता. सांगली महापालिकेत तो पाळला गेला नाही, हा शिवसेनेचा अनुभव आहे, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हा परिषद सत्तेत भाजपसोबत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय सर्वानुमते घेतला जाईल. स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची मते जाणून घेतली जातील. त्यानंतर संपूर्ण अहवाल तयार करून तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडला जाईल. अंतिम निर्णय त्यांच्या मार्गदर्शनानुसार घेतला जाईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

भाजपची भूमिका अनेकदा सोयीस्कर असते. त्यामुळे आमची भूमिका त्यांनी ठरवू नये. गरज भासली तर चर्चा होते; पण निर्णय स्थानिक पातळीवरील मतांवर आणि पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनावरच होतो, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी जिल्हा परिषद सत्तेबाबतचा अंतिम अहवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांना सादर करण्यात येणार असून, त्यानंतरच पुढील राजकीय दिशा स्पष्ट होणार आहे. कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, मोहन वनखंडे, गौरव नायकवडी, नगरसेवक युवराज बावडेकर आदी उपस्थित होते.

follow us