संबंध सापडला तर राजीनामा देईन, मंत्रालयातील लाचप्रकरणावर मंत्री झिरवाळ यांचं मोठं वक्तव्य
मंत्री झिरवाळ यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट भूमिका मांडली. मी कुठेही पाठीशी घालणार नाही. मंत्री किंवा पीए यांच्याशी त्याचा संबंध नाही.
Minister Zirwal’s big statement on the bribery case in the ministry : राज्याच्या सत्तेचे केंद्र असलेल्या मंत्रालयातून भ्रष्टाचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीने मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर धाड टाकत अन्न व औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, थेट मंत्र्यांच्या दालनात झालेल्या या घटनेने राजकीय वातावरण देखील तापले आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत असलेला लिपिक राजेंद्र ढेरंगे याला 35 हजार रुपयांची लाच घेता एसीबीने जाळ्यात पकडले. एका तक्रारदाराचा मेडिकल परवाना निलंबित करण्यात आला होता. हा परवाना पुन्हा पूर्ववत करण्यासाठी ढेरंगे याने सुरूवातीला 50 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. अखेर 35 हजार रुपयांवर तडजोड झाली आणि ही रक्कम स्वीकारतानाच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
या कारवाईमुळे प्रकरण अधिकच चर्चेत आले, कारण ही संपूर्ण घटना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात घडली. एसीबीच्या सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने मंत्र्यांच्या कार्यालयाचा ताबा घेत तपास सुरू केला. तपास पूर्ण होईपर्यंत काही काळ कार्यालयाचे कामकाज थांबवण्यात आले. आरोपीने लाचेची मागणी करताना मंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या नावाचा उल्लेख केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली तरी याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.
मराठी मुंबईचा सामाजिक समतोल बिघडला…, मुख्यमंत्र्यांनी भाजपचा महापौर मुंबईवर लादल्याचा शिवसेनेचा आरोप
प्रकरणानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. या प्रकाराला मी कुठेही पाठीशी घालणार नाही. मंत्री किंवा पीए यांच्याशी त्याचा संबंध नाही. त्याने जी हिंमत केली आहे त्यासाठी त्याला जबाब द्यावाच लागेल. चौकशीतून माझा कोणताही संबंध आढळला तर मी राजीनामा देईन, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, एसीबीने रंगेहात पकडल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात खुलेआम लाचखोरी सुरू आहे. थेट मंत्र्यांच्या दालनात भ्रष्टाचार होणे ही राज्यासाठी लाजीरवाणी बाब आहे. मंत्रालयातील या कारवाईनंतर प्रशासनात सतर्कता वाढवण्यात आली असून, पुढील चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातून नेमके कोणकोणते धागेदोरे समोर येतात, यावर पुढील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी अवलंबून असतील.
