स्वातंत्र्यदिनी ‘वंदे मातरम्’ म्हणणे सक्तीचे; राज्य सरकारचा आदेश

Independence Day : स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रीय गीत (वंदे मातरम्) म्हणण्यात यावे असे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.

Independence Day

Independence Day : स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रीय गीत (वंदे मातरम्) म्हणण्यात यावे असे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन यंदा शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील स्वातंत्र्य दिन समारंभासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व विभागीय, जिल्हा, उपविभागीय व तालुका मुख्यालयांसह ग्रामपंचायत मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुंबईतील मंत्रालयात सकाळी 9.05 वाजता मुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करून होणार आहे. पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, तर संबंधित विभागीय मुख्यालयात विभागीय आयुक्त किंवा जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे असे आदेश देखील राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.

जिल्हा आणि विभागीय मुख्यालयातील मुख्य शासकीय समारंभ सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर सकाळी 8.35 ते 9.35 या वेळेत अन्य कोणतेही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ध्वजारोहणानंतर सावधान स्थितीत राष्ट्रीय गीत (वंदे मातरम्)’म्हणण्यात यावे. त्यानंतर राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत म्हणावे आणि त्यानंतर राज्यगीत म्हणण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित करणारा तसेच उपस्थितांमध्ये देशाची एकता व अखंडता कायम ठेवण्याची प्रेरणा निर्माण करणारा असावा.

दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन

स्वातंत्र्य दिनानिमित्त दिवसभर वृक्षारोपण, आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा, देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धा यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना आहेत. देशभक्तीपर गाणी व भाषणे, विद्युत रोषणाई, तसेच देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित गाण्यांचा प्रचार करण्यावरही भर देण्यात आला आहे.

राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारती तसेच ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्यांवर राष्ट्रध्वज उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद आणि सिंधुदुर्ग यांसारख्या किल्ल्यांचाही यात समावेश आहे.

कट रचल्याचे पुरावे नाही; माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध

समारंभाला स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नी व आई-वडील, शौर्य पुरस्कार विजेते, विविध मान्यवर आणि प्रमुख नागरिकांना निमंत्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

follow us