2 कोटींच्या ‘हेअर कट’वर सुप्रीम कोर्टाची कात्री; भावनांना नाही तर पुरव्यांना प्राधान्य; भरपाई 25 लाखांवर
2 कोटींचं आर्थिक नुकसान कसं झालं? याचे पुरावे कुठे आहेत? केवळ 'असं होऊ शकतं' या तर्कावर कोट्यवधी रुपये कोणालाही दिले जाऊ शकत नाहीत.
The Supreme Court has taken legal action against this excessive compensation : कल्पना करा, तुम्ही सलूनमध्ये जाता आणि स्टायलिस्टने तुमचे केस थोडे जास्त कापले म्हणून तुम्ही चक्क 2 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करता! ऐकायला हे फिल्मी वाटत असलं, तरी दिल्लीच्या एका नामांकित मॉडेलने हे खरं करून दाखवलं होतं. पण आता या प्रकरणात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक असा निर्णय दिला आहे, जो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय.
नेमकं प्रकरण काय होतं? हे प्रकरण आहे दिल्लीतील ‘आयटीसी मौर्य’ या आलिशान हॉटेलमधील. आशना राय नावाची एक व्यावसायिक मॉडेल या हॉटेलच्या सलूनमध्ये हेअरकटसाठी गेली होती. आशना यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी स्टायलिस्टला केस कसे कापायचे? याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, स्टायलिस्टने त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून खूपच आखूड केस कापले. एका मॉडेलसाठी तिचे केस हे तिचं सर्वात मोठं भांडवल असतं. या एका चुकीच्या हेअरकटमुळे आशनाला मोठा मानसिक धक्का बसला. त्यामुळे तिने दावा केला की, खराब हेअरकटमुळे तिचे मॉडेलिंगचे मोठे प्रोजेक्ट्स हातचे गेले, तिला काम मिळणं बंद झालं आणि तिच्या व्यावसायिक प्रतिमेचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं.
आशना राय यांनी याप्रकरणी राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे (NCDRC) दाद मागितली. ग्राहक आयोगाने प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन हॉटेलला चक्क 2 कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते. एका हेअरकटसाठी दिलेली ही आजवरची सर्वात मोठी नुकसान भरपाई मानली जात होती. साहजिकच, हॉटेल प्रशासनाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
मराठी मुंबईचा सामाजिक समतोल बिघडला…, मुख्यमंत्र्यांनी भाजपचा महापौर मुंबईवर लादल्याचा शिवसेनेचा आरोप
या प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने अतिशय महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. न्यायमूर्ती राजेश बिंदल आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने स्पष्टपणे सांगितले की, न्याय हा केवळ भावनांवर किंवा अनुमानांवर चालत नाही. न्यायालयाने 34 पानांच्या निकालात नमूद केले की, ग्राहक आयोगाने 2 कोटींचा आकडा ठरवताना ठोस पुराव्यांची तपासणी केलीच नाही.
कोर्ट म्हणाले, तुम्हाला मानसिक धक्का बसला हे मान्य, पण त्या धक्क्यामुळे तुमचं 2 कोटींचं आर्थिक नुकसान कसं झालं? याचे कागदोपत्री पुरावे कुठे आहेत? केवळ ‘असं होऊ शकतं’ या तर्कावर कोट्यवधी रुपये कोणालाही दिले जाऊ शकत नाहीत. परिणामी, कोर्टाने 2 कोटींचा तो आदेश रद्द केला आणि भरपाईची रक्कम थेट 25 लाख रुपयांवर आणली.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने एक मोठा संदेश दिलाय. ग्राहक म्हणून आपले हक्क नक्कीच आहेत, पण जेव्हा आपण मोठ्या नुकसानीचा दावा करतो, तेव्हा आपल्याकडे त्याचे ठोस पुरावे असणे अनिवार्य आहे. भावनिक तर्क लावून कायद्याच्या चौकटीत मोठी भरपाई मिळवणे शक्य नाही. 2 कोटींच्या अपेक्षेत असलेल्या मॉडेलला आता 25 लाखांवर समाधान मानावे लागणार आहे, कारण सुप्रीम कोर्टाने या अवाजवी भरपाईवर कायदेशीर ‘कात्री’ चालवलीय.
