मुंबई विमानतळावरील एकही आंतरराष्ट्रीय विमान नवी मुंबईत हलवू देणार नाही, फडणवीसांची ठाम भूमिका

मुंबई विमानतळावरील एकही विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवले जाणार नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली आहे.

Untitled Design   2026 11 11T151851.177

Untitled Design 2026 11 11T151851.177

CM Devendra Fadnavis’ letter to the Union Civil Aviation Minister : मुंबई आणि नवी मुंबईतील विमानतळांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एकही विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवले जाणार नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत स्थलांतरित करण्याची कोणतीही योजना मान्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही विमानतळ स्वतंत्रपणे आणि आपापल्या क्षमतेनुसार पूर्ण क्षमतेने कार्यरत राहावेत, अशी त्यांची भूमिका आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांना पत्र लिहून आपला आक्षेप नोंदवला आहे. तसेच मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-1 च्या पुनर्विकासासाठी टप्प्याटप्प्याने काम करण्याचा पर्यायी प्रस्तावही सादर केला आहे.

मुंबई विमानतळाचे संचालन करणाऱ्या ‘मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड’ अर्थात एमआयएएल कंपनीने पुढील उन्हाळी वेळापत्रकापासून काही आंतरराष्ट्रीय विमानसेवा नवी मुंबई विमानतळावर हलवण्याची योजना आखली होती. बहरीन, दोहा, जकार्ता, जेद्दाह, कुवेत, मस्कत, रियाध आणि शारजा यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय शहरांसाठीची विमानसेवा नवी मुंबई विमानतळावर हलवण्याचा प्रस्ताव होता. एकूण 14 आंतरराष्ट्रीय शहरांसाठीच्या विमानसेवा स्थलांतरित करण्याची योजना असल्याचे सांगितले जात आहे.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

मुंबई विमानतळावरील टर्मिनल-1 च्या पुनर्विकासाचे काम प्रस्तावित असल्याने उन्हाळी वेळापत्रकातील सर्व विमानसेवांचे स्लॉट सामावून घेणे कठीण होईल, असा कंपनीचा युक्तिवाद होता. याशिवाय टर्मिनल-2 वरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये सुमारे एक तृतीयांश कपात करावी लागू शकते, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. या बदलाचा परिणाम दरवर्षी सुमारे 50 लाख देशांतर्गत प्रवाशांच्या क्षमतेवर होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे विमान कंपन्या आणि संबंधित जागतिक प्रतिनिधी संस्थांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला.

मुंबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर हलवण्याच्या प्रस्तावावर विविध विमान कंपन्यांनी आक्षेप घेतला होता. प्रवाशांची गैरसोय, विमानसेवेचे नियोजन आणि दोन्ही विमानतळांमधील अंतर यांसारख्या मुद्द्यांमुळे या प्रस्तावाला विरोध होत होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप केला. त्यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांना पत्र पाठवून मुंबई विमानतळावरील एकही आंतरराष्ट्रीय उड्डाण बंद किंवा दुसरीकडे वळवू नये, अशी ठाम भूमिका मांडली. मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ या दोन्ही विमानतळांचे स्वतंत्र अस्तित्व आणि कार्यक्षमता कायम राहणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे.

मुंबई विमानतळावरील टर्मिनल-1 च्या पुनर्विकासाचा मुद्दा या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे. सध्याच्या प्रस्तावानुसार, सुमारे 1.5 कोटी प्रवाशांची वार्षिक क्षमता असलेले टर्मिनल-1 डिसेंबर 2030 पर्यंत पूर्णपणे पाडून त्याऐवजी नवीन टर्मिनल उभारण्याचे नियोजन आहे. मात्र, जुने टर्मिनल एकाच वेळी बंद करून पुनर्विकास केल्यास पुढील तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ विमानसेवेवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्याचा पर्याय सुचवला आहे. या प्रस्तावानुसार, सर्वप्रथम नवीन टर्मिनल-1B चे बांधकाम पूर्ण करण्यात यावे.

शरद पवारांच्या त्या पत्रानंतर सोनिया गांधी यांच्या डोळ्यात अश्रू, ‘बिलॉन्गिंग’मधून मोठा खुलासा

त्यानंतर सध्या टर्मिनल-1A मधून सुरू असलेले कामकाज नवीन टर्मिनल-1B मध्ये स्थलांतरित करावे. हे काम पूर्ण झाल्यानंतर जुने टर्मिनल-1A पाडून त्याचा पुनर्विकास करावा. या प्रक्रियेमुळे नवीन टर्मिनल तयार होईपर्यंत सध्याच्या विमानसेवा सुरू ठेवता येतील. त्यामुळे विमानांचे मार्ग बदलण्याची किंवा आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर हलवण्याची गरज भासणार नाही, असा युक्तिवाद मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर हलवण्याच्या प्रस्तावावर नवा पेच निर्माण झाला आहे. मुंबई विमानतळावरील प्रवाशांची संख्या, विमान कंपन्यांचे नियोजन आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी लक्षात घेता दोन्ही विमानतळांची क्षमता स्वतंत्रपणे विकसित करण्यावर मुख्यमंत्र्यांचा भर आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून आणि संबंधित विमानतळ प्रशासनाकडून अंतिम निर्णय काय घेतला जातो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबईकर आणि विमान प्रवाशांसाठी हा विषय महत्त्वाचा असून, विमानसेवा स्थलांतरित करण्याऐवजी पुनर्विकासाचा पर्यायी मार्ग स्वीकारला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version