गंगेचे पाणी पिणार नाही म्हणणारे लोक गोदातीरी येऊन भाषण करतात; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

नाशिक शहराचा आजपर्यंत झालेला आणि पुढे होणारा विकास करण्याची क्षमता केवळ भाजपकडेच असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केला आहे.

Untitled Design (245)

Untitled Design (245)

Chief Minister Devendra Fadnavis strongly criticized MNS President Raj Thackeray : नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “नाशिकमध्ये येऊन ज्यांना प्रभू रामाची आठवण होत नाही, त्यांच्यात राम उरलेला नाही. आणि जो रामाचा नाही, तो कुणाच्याच कामाचा नाही,” अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला. देव आहे की नाही, असा प्रश्न काही जणांना पडत असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, अशा लोकांवर अधिक भाष्य करणार नाही. मात्र नाशिक शहराचा आजपर्यंत झालेला आणि पुढे होणारा विकास करण्याची क्षमता केवळ भाजपकडेच आहे, असा दावा त्यांनी केला.

‘नाशिक दत्तक घेतले होते, मग काय झाले?’ अशी खिल्ली उडवणाऱ्यांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘तक्रार करणारे आम्ही नाही. कोरोनाकाळात विरोधक घरात बसले असताना देवा भाऊ नाशिकमध्ये येऊन थेट आयसीयूमध्ये गेले. हे लोक कधी नाशिकला आलेच नाहीत. हे निवडणूक पर्यटन करणारे आहेत.’ कुंभमेळ्याच्या आयोजनावर बोलताना त्यांनी सांगितले की, त्या काळात महानगरपालिका त्यांच्या ताब्यात असतानाही विरोधकांनी हात वर केले होते. मात्र राज्य सरकारने निधी उपलब्ध करून सुरक्षित आणि यशस्वी कुंभमेळा भरवला. ‘कुंभमेळ्याची खिल्ली उडवणारे आणि गंगेचे पाणी पिणार नाही म्हणणारे लोक गोदातीरी येऊन भाषण करतात,’ अशी टीकाही त्यांनी केली.

महिलांना 5 लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज, खड्डेमुक्त रस्ते… मुंबईसाठी महायुतीच्या जाहीरनाम्यात काय?

विकासकामांचा आढावा देताना मुख्यमंत्री म्हणाले की, जळगावपासून जवळपास 30 हजार कोटी रुपयांची कामे नाशिक व परिसरात हाती घेण्यात आली आहेत. नाशिक विमानतळाचे काम सुरू असून ते केवळ कुंभमेळ्यापुरते मर्यादित नाही. “जिथे कनेक्टिव्हिटी चांगली असते, तिथेच गुंतवणूक येते,’ असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नाशिकची पुढील ‘जीवनवाहिनी’ ठरेल असा सुमारे 10 हजार कोटी रुपयांचा रिंगरोड प्रकल्प उभारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

साधुग्रामच्या जागेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, 2016 साली महानगरपालिकेत मनसेची सत्ता असताना त्या 54 एकर जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. भाजपची सत्ता आल्यानंतर त्या ठिकाणी वृक्षारोपण करून परिसर हिरवागार करण्यात आला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार काही झुडपे हटवली जातील, मात्र कोणत्याही मोठ्या झाडांना हात लावला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि विरोधकांवर निशाणा साधत नाशिकमधील विकासकामांचा ठामपणे आढावा मांडला.

Exit mobile version