पुणे : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणाची मागणी करत मुंबईच्या दिशेने निघालेला आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा भव्य मोर्चा आज (24 जानेवारी) मध्यरात्री पुण्यात दाखल झाला. त्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते खराडी भागातून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागाच्या दिशेने रवाना झाले. तिथून पुणे विद्यापीठ चौक, औंधमार्गे हा मोर्चा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दिशेने जाणार आहे.
एका बाजूला जरांगेंसोबतचा जनसागर मुंबईच्या दिशेने येत असताना दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावच्या यात्रेसाठी दोन दिवस सुट्टीवर गेले आहेत. सातारा जिल्ह्यातील दरे (ता. महाबळेश्वर) या मुख्यमंत्री शिंदे यांच्या मूळ गावसह आजूबाजूच्या जवळपास 15 गावांची मिळून उत्तेश्वर देवाची यात्रा भरते. मुख्यमंत्री (Eknath Shinde) झाल्यानंतर ते दुसऱ्यांदा या यात्रेसाठी गावी गेले आहेत. (Chief Minister Eknath Shinde has gone on leave for two days to visit his native village.)
काल (23 जानेवारी) सायंकाळी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी प्रशासनाच्या वतीने स्वागत केले. तर सातारा पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. शिवाय गावकऱ्यांनीही ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. दरम्यान, बुधवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 26 जानेवारीची ग्रामसभाही पार पडणार आहे. सोबतच परिसरातील ग्रामस्थांच्या आणि साताऱ्यातील राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी, शेत शिवार भेट काही राजकीय कार्यक्रमही असणार आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मुंबईकडे मार्गक्रमण सुरू केले आहे. जालना, बीड, अहमदनगरनंतर मनोज जरांगे पाटील लाखो समाजबांधवांसह पुण्यात पोहोचले आहेत. आज दिवसभर ते पुणे शहरात असणार आहेत. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते खराडी भागातून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागाच्या दिशेने रवाना झाले. तिथून पुणे विद्यापीठ चौक, औंधमार्गे हा मोर्चा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दिशेने जाणार आहे. 26 तारखेला मुंबईमध्ये पोहचण्याचे त्यांचे नियोजन आहे.