Download App

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतली अर्जुन रामगिर यांच्या आत्मक्लेश यात्रेची भेट

  • Written By: Last Updated:

ठाणे :- सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित नागरी प्रश्न तातडीने सुटावेत यासाठी सोलापूर ते मुंबई असा पायी चालत आलेल्या 72 वर्षीय अर्जुन रामगिर यांच्या आत्मक्लेश यात्रेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेत राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री ठाण्यात त्यांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. तसेच शक्य ते सारे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांना दिले.

सोलापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित राहिले असून त्यामुळे हा भाग विकासापासून वंचित राहिला आहे. शहरातील विमानतळ फनेलच्या आड येणाऱ्या चिमणीचा विषय असेल, उजनी धरणाच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेची रखडपट्टी असेल किंवा मग उद्योग धंद्यांचा अभाव असेल, शहराला पाच दिवसातून एकदा होणारा पाणीपुरवठा असेल असे अनेक प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. या सर्व कारणांमुळे सोलापूर जिल्हयातून गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले असून वेळीच ते रोखणे गरजेचे आहे. तसेच या प्रश्नांकडे सर्वच राजकीय नेते आणि पक्षाकडून दुर्लक्ष झाले असल्याने अखेर हे प्रश्न तातडीने सुटावेत यासाठी सोलापूर ते मुंबई आत्मक्लेश यात्रा काढण्याचा संकल्प अर्जुन रामगिर यांनी केला. त्यानुसार त्यांनी वयाच्या 72 व्या वर्षी थेट पायी मुंबईकडे चालत जाण्याचा निर्धार केला.

रामगिर पनवेलपर्यंत चालत आल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली त्याच वेळी ते मुंबईकडे चालत येत असल्याची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर गेली. त्यांनी तातडीने त्यांच्या याची दखल घेऊन पनवेलमधील शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि माजी नगरसेवक ऍड. प्रथमेश सोमण यांना त्यांची विचारपूस करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची विचारपूस केली त्यांच्यावर प्रथमोपचार करून मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार त्यांना गाडीत बसवून वर्षा बंगल्यावर आणून त्यांना जेवू खाऊ घातले. त्यानंतर ठाणे येथे त्यांची भेट घेतली.

‘ऑपरेशनचं सांगू नका, मुका मार आम्हालाही देता येतो’; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिर यांचं म्हणणं सविस्तरपणे समजून घेऊन ते लेखी देण्यास सांगितले. तसेच सोलापूर शहरातील चिमणीचा प्रश्न मला माहित असून तो लवकरच सोडवू असेही सांगितले. तसेच सोलापूर जिल्ह्यातील इतरही विकासकामाना प्राथमिकता देऊन त्यातील जी कामे तातडीने सोडवता येथील ती नक्की सोडवू असे सांगून त्यांना आशवस्त केले.

सोलापूर शहरातील सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा रामगिर यांचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे शिंदे यांनी यावेळी मान्य केले. तसेच अशा सर्वसामान्य लोकांसाठी माझ्या वर्षा बंगल्याचे दरवाजे सदैव उघडे असल्याचे देखील त्यांनी सांगितले. संवेदनशील मुख्यमंत्री अशी ओळख असलेल्या मुख्यमंत्र्यांना आपल्या आंदोलनाची दखल घेतलेली पाहून रामगिर हेदेखील भारावून गेले. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी समाधानाने पुन्हा सोलापूर जाण्याचा निर्णय घेतला.

यावेळी पनवेलमधील शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि माजी नगरसेवक ऍड. प्रथमेश सोमण, रामगिर यांचे सहकारी संजय थोबडे तसेच पनवेलमधील सर्व शिवसैनिक देखील उपस्थित होते.

Tags

follow us