छत्रपती संभाजीनगर : शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलाच्या लग्नात महापालिकेची यंत्रणाच दिमतीला दिल्याचे समोर आले आहे. येत्या रविवारी (19 नोव्हेंबर) रोजी सत्तार यांचा धाकटा मुलगा अब्दुल आमेर याचे लग्न बीड बायपास रस्त्यावरील एका लॉनवर पार पडणार आहे. यासाठी खाजगी लॉन भोवतीची जमीन पाहुण्यांच्या पार्किंगला सपाट करण्यासाठी आणि परिसर सुशोभिकरणासाठी तीन दिवस महापालिकेची यंत्रणा काम करत होती. (civic body rus the system to work at the wedding venue of Abdul Amer, the younger son of Maharashtra Minister Abdul Sattar)
खाजगी कामासाठी महापालिकेची यंत्रणा वापरल्याने महापालिकेबद्दल प्रश्न विचारले जात आहे. याबाबत महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, “कोणाच्या मुलाचे लग्न असल्याने आणि शुभ कार्य असल्याने या विषयावर मला फारसे बोलायचे नाही. पण मला एवढेच सांगायचे आहे की, नागरी संस्थेने अशा सेवा मोफत देऊ नयेत. जो कोणी अशा सेवांचा लाभ घेत असेल त्याने पैसे द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या ताफ्यांसाठी लॉनची पार्किंगची जागा सपाट आणि आरक्षित करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. लॉनसमोरील तीन एकरचा भूखंड मंत्री व इतर लोकप्रतिनिधींच्या वाहनांच्या पार्किंगसाठी निश्चित करण्यात आला आहे. दोन किलोमीटरपर्यंतचे रस्त्यालगतचे भूखंड (बीडच्या दिशेने) स्वच्छ करून सामान्य पार्किंग क्षेत्रासाठी सपाटीकरण करण्यात आले आहे.
याबाबत एका अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, “खासगी कंत्राटदार हे काम करत आहे. पार्किंगच्या व्यवस्थेसाठी खाजगी भूखंड साफ आणि सपाट करण्यासाठी आम्हाला त्याला मदत करण्यासाठी सांगितले गेले आहे. तर झोन-8 चे प्रभाग अधिकारी भरत बिरहरे यांनी सांगितले की, “महापालिका उपायुक्त सोमनाथ जाधव यांच्या सूचनेनुसार आम्ही साफसफाई आणि जमिनीच्या सपाटीकरणाची कामे केली आहेत.”
तर अन्य अधिकाऱ्यांनी मात्र कानावर हात ठेवले. पालिका प्रशासक जी श्रीकांत माध्यमांना म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लग्न समारंभाला येणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे. त्यासाठीच आम्ही रस्त्यावरील ढिगारा किंवा कोणतेही नको असलेले साहित्य हटवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अधिकार्यांनी कोणत्याही प्रकारे खाजगी मैदाने स्वच्छ करणे आणि कार्यक्रमासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी त्यांना सपाट करणे हे अपेक्षित नाही, असेही त्यांनी सांगितले.