भीमाशंकर : मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज (दि.11) संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली असून, त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सरकारची बाजू मांडत मोठी अपडेट दिली आहे. ते भीमाशंकर येथे माध्यमांशी बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भुमिका सरकारची स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. दुर्दैवाने ते सुप्रीम कोर्टात रद्द झालं. (CM Shinde On Maratha Reservation)
शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकाराचीदेखील इच्छा आहे. परंतु, ते देताना हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकलं पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांना सामाजिक आणि शैक्षणिक मागास सिद्ध करणे गरजेचे आहे. त्यावर काम केले जात असल्याचेही शिंदेंनी यावेळी सांगितले. या कामासाठी समिती नेमण्यात आली असून, यासाठी काहीसा कालावधी लागेल. तो वेळ सरकारला देण्या यावा असे आवाहन जरांगे यांना केले असल्याचेही शिंदे म्हणाले.
कुणाची फसवणूक करू शकत नाही
आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या बाजूने असून, ते देताना कुणाचीही फसवणूक करू शकत नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही हेदेखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण देण्यावर सरकारचा भर असून, कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आल्याचे शिंदे म्हणाले.
हे सरकार निर्णय घेणारं सरकार आहे. इतर समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण मिळावं असे प्रयत्न आहेत. सुप्रीम कोर्टाने जेव्हा स्टे दिला होता तेव्हा आम्ही ज्यांचं सिलेक्शन झालं होतं, मुलाखती झाल्या होत्या अशा तीन हजार सातशे तरुणांना नोकऱ्या आम्ही दिल्याचेही यावेळी शिंदेंनी सांगितले. ओबीसींना मिळणारे लाभ आपण मराठ्या देत असून, शासन कोणालाही फसवू इच्छित नाही. त्यासाठी विरोधकांनीदेखील यामध्ये सहकार्याची भूमिका घ्यावी असे म्हणत त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पत्रकारांशी संवाद.. (११ सप्टेंबर २०२३)
https://t.co/XhGMqQCZG4— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 11, 2023
माझा उपचाराच मराठा आरक्षण – जरांगे
दरम्यान, सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सर्वपक्षीय बैठकीबाबत मी यापूर्वीही बोललो आहे, मराठा समाजाने सर्व पक्षांना समृद्ध केले आहे, आता मराठ्यांना देण्याची जबाबदारी त्यांची आहे. सगळा महाराष्टर् पाहतोय की कोणता पक्ष आम्हाला साथ देतोय. कोणता पक्ष किती भक्कम ताकदीने उभं राहतो. कोण कोणावर अन्याय करतो हे आज आमच्या लक्षात येईल,असं जरांगे पाटील म्हणाले. माझा उपचाराचं मराठा आरक्षण आहे, आज जी सर्व बैठक आहे, त्यात माझ्या वेदनांवर सर्वांना उपचार करावे. माझ्या वेदना, समजाच्या वेदना आहे. माझे उपचार म्हणजे, मराठा आरक्षण आहे.