मुंबई : सत्यजित ताबें यांच्याबाबत हायकमांड निर्णय घेणार असल्याचं मोठं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं आहे. नाशिक पदवीधर मतदासंघात विजयी झाल्यानंतर सत्यजित तांबेंबाबत काँग्रेसकडून आता कोणता निर्णय घेण्यात येणार? याबाबत नाना पटोले(Nana Patole) यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलीय.
सत्यजित तांबे यांच्या घराण्यासोबत काँग्रेसचं कोणत्याही प्रकारचं वैर नसून तांबे यांच्याशी आमचे मतभेद नसल्याचं नाना पटोलेंनी यावेळी सांगितलंय. एकीकडे निवडणुकीच्या अगोदर सुधीर तांबे यांच्या बंडखोरीमुळे त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर सत्यजित तांबे यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती.
अखेर आता निवडणुकीत सत्यजित तांबेंचा विजय झाल्यानंतर काँग्रेसकडून युटर्न घेण्यात आल्याचं दिसून येत आहे. पुढे बोलताना पटोले म्हणाले, जोपर्यंत सत्यजित तांबेंबाबत सविस्तर प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत कोणताही निर्णय होणार नाही. नाशिक पदवीधर निवडणुकीत ज्या घडामोडी घडल्या, त्या सर्व भाजपकडून ठरवून करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय.
तसेच सातत्याने भाजपकडून घरं फोडण्याचं काम सुरु आहे. घरं फोडण्याचे परिणाम भाजपला भविष्यात भोगावे लागणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. तर अंतर्गत नाराजीमुळे अमरावती आणि नागपूर मतदारसंघात भाजपला फटका बसल्याचं भाकीतही त्यांनी केलंय.
या निवडणुकीत भाजपकडूनच हे सर्व करण्यात आलं असून दुसऱ्याची घरं फोडल्याने त्यांना आनंद होत असल्याचंही त्यांनी म्हंटलंय. सध्या जिंकले ते आमचे, अशी भाजपची भूमिका असून तांबे घराण्यासोबत आमचं वैर नसल्याचं पटोलेंनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणूक निकालानंतर नाना पटोले यांनी आज प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिलीय. सत्यजित तांबेंबद्दल हायकमांडकडून निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडं सत्यजित तांबे निवडून आल्यानंतर उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. तांबे उद्या काय भूमिका घेणार? याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. तांबे जो निर्णय घेतील त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.