जळगाव : अंतर्गत बंडाळीमुळेच काँग्रेसचे नेते बाहेर पडणार असल्याचं भाकीत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलंय. सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी सुरु असून पुढील काळात काँग्रेसमध्ये कोणी राहील की नाही हे सांगता येणार नसल्याचंही त्यांनी म्हंटलंय. गिरीश महाजन आज पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळाच्या गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. थोरातांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये असलेली गटबाजी दिसून आली आहे.
महाजन म्हणाले, बाळासाहेब थोरात काँग्रेसचे बडे नेते आहेत. ते अनेकदा मंत्री राहिलेले आहेत. अंतर्गत गटबाजीमुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे. दरम्यान, अंतर्गत गटबाजी अशीच सुरु राहील तर काँग्रेसमध्ये पुढील काळात कोण राहील की नाही हे सांगता येणार नसल्याचं ते म्हणाले आहेत. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे सत्यजित तांबे यांच्यावर अन्याय झाला असून काँग्रेसने आपल्या हाताने पायावर दगड मारुन घेतल्याचंही भाष्य त्यांनी सत्यजित तांबे प्रकरणावर केलंय.
सुधीर तांबे अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये राहिले आहेत. त्यांचा मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. आपल्यावर विधानपरिषदेच्या निवडणुकीत अन्याय झाल्याचं स्वत: सत्यजित तांबे यांनीच पत्रकार परिषदेत स्पष्ट केल्याचं त्यांनी म्हंटलंय.
काँग्रेसमध्ये तांबे परिवार हा जूना आहे. सुधीर तांबेंचं मतदारसंघात मोठं काम आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब थोरातही दिग्गज नेते आहेत. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे आता अधोगतीला सुरुवात झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय.
तसेच पुढील काळात असंच सुरु राहिलं तर काँग्रेसमध्ये मोठे नेत्यांपैकी एकही नेता राहणार नसल्याचं भाकीत गिरीश महाजनांनी केलं आहे. काँग्रेसमध्ये मी मोठा, तो छोटा, श्रेयवादाची लढाई सुरु आहे. त्यामुळे अंतर्गत बंडाळीमुळेच काँग्रेसचे नेते बाहेर पडणार असल्याचं ते म्हणालेत.