सांगली : आम्ही मागच्या पाच वर्षांपासून तयारी करत होतो, दोन महिन्यांपासून जागेसाठी हेलपाटे घालत होतो. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhtrapati) हे जो पक्ष सांगतील त्या पक्षाला ती जागा द्यायची, असे ठरलेले असताना कोल्हापूर आणि सांगलीचा संबंध येतो कुठे? असे असतानाही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सांगलीत येतात काय आणि उमेदवारीची घोषणा करतात काय… मित्रपक्षांमध्ये असे होते का? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे होते का? असे सवाल करत काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम यांनी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना कार्यकर्त्यांसमोरच सांगलीची जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला कशी गेली असा जाब विचारला. (Congress officials and workers meeting was held in Sangli to understand the angry workers.)
सांगलीची जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला गेल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचा सांगलीत पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, पूर्वी आमच्यात गटबाजी होती, पण यावेळी आम्ही गटबाजीला पूर्णविराम दिला. काँग्रेस हा एकच पक्ष, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा एकच गट आम्ही तयार केला होता. विशाल पाटील यांच्या रुपाने जिल्हा काँग्रेस कमिटीकडून एकच नाव, राज्य काँग्रेस कमिटीकडून एकच नाव दिल्लीला गेले. विशाल पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी असे त्यांना सांगितले होते. जिल्ह्यात 200 किलोमीटर आम्ही जनसंवाद पदयात्रा काढली. यंदा काँगेसची जागा ही काँग्रेसला मिळाली पाहिजे हा आग्रह होता. पण कोणाची तरी दृष्ट लागली. ती दृष्ट काढण्याची ताकद आमच्यात आहे, असा इशाराही अप्रत्यक्षपणे त्यांनी दिला.
सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील असे सांगितले होते. आम्ही लोकांना सांगत गेलो की यंदा काँग्रेसचा खासदार असेल. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती हे जो पक्ष सांगतील त्या पक्षाला ती जागा द्यायची, असे ठरलेले असताना कोल्हापूर आणि सांगलीचा संबंध येतो कुठे? असे असतानाही उद्धव ठाकरे सांगलीत येतात काय आणि उमेदवारीची घोषणा करतात काय… मित्रपक्षांमध्ये असे होते का? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे होते का? पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मग आता मला लोकं विचारतात शेवटी काय झाले? तुम्ही प्रयत्न केले, पण जागा देऊन चूक केलीच. तसंच कोण काय करत होते, याकडे का लक्ष दिलं नाही? असा सवालही कदम यांनी सर्वच जेष्ठ नेत्यांना केला.