मुंबई : राज्यातील साखर कारखान्यांना भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी व सध्याच्या जागतिक स्पर्धेत टिकुन राहावयाचे असेल तर साखरेव्यतिरिक्त इतर उपपदार्थावर आधारित उत्पादने तयार करण्याची नितांत गरज आहे. साखर कारखान्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी भविष्यात साखर, इथेनॉल आणि सी.बी. जी., हायड्रोजन आदी उप उत्पादनांचे उत्पादन घेतले पाहिजे, असा सल्ला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी कारखान्यांना दिला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. च्या पुरस्कार वितरण कार्यक्रम व ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शरद पवार बाेलत हाेते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, व्ही.एस.आय.चे उपाध्यक्ष माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, भविष्यात साखर कारखान्यांना आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी व सध्याच्या जागतिक स्पर्धेत टिकुन राहावयाचे असेल तर साखरेव्यतिरिक्त इतर उपपदार्थावर आधारित उत्पादने तयार करण्याची नितांत गरज आहे. सध्या भारतात मागणीपेक्षा साखर उत्पादन जास्त होते. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला किफायतशीर दर मिळत नाही. त्यामुळे साखरेच्या अतिरिक्त साठ्यामध्ये वाढ होत आहे आणि साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण सहन करावा लागतो. साखरेचे साठे कमी करण्यासाठी अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मितीसाठी वापर करणे हे साखर उद्योगांसाठी फायदेशीर ठरले आहे.
यंदाच्या गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये जागतिक पातळीवर कच्च्या साखरेचे उत्पादन १९९ दशलक्ष टन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी १८५ दशलक्ष टन साखर उत्पादन झाले होते. तसेच भारताचे साखरेचे उत्पादन ३८ दशलक्ष टन होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील हंगाम २०२१-२२ मध्ये भारताने ३९ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन केले होते. हा एक जागतिक स्तरावर उच्चांक प्रस्थापित झाला असून आपण ब्राझिलला मागे टाकले आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
….या कारखान्यांना मिळाले पुरस्कार
कै.वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखानाह पुरस्कार डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगी ता.कडेगाव जि.सांगली या कारखान्याला प्रदान करण्यात आला. कै.रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार जयवंत शुगर्स लि.धावरवाडी ता.कराड जि.सातारा, कै.किसन महादेव ऊर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार क्रांती अग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखाना कडूस ता.पलूस जि.सांगली, कै.कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, कै.डॉ.आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार दौंड शुगर प्रा.लि.पो.आलेगाव ता.दौंड, जि.पुणे, कै.विलासरावजी देशमुख उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना ता.कागल जि.कोल्हापूर या कारखान्याला प्रदान करण्यात आला.