स्मार्ट मीटरचा कट होताच ‘जुगाड’; अनधिकृत वीज जोडणी करणाऱ्या 4 ग्राहकांवर गुन्हे

जळगाव शहरातील नाथवाडा परिसरात सरूबाई तुकाराम पाटील यांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनधिकृत जोडणी करून वीज वापरल्याचं आढळलं.

News Photo   2026 08 25T095117.428

स्मार्ट मीटरचा कट होताच 'जुगाड'; अनधिकृत वीज जोडणी करणाऱ्या 4 ग्राहकांवर गुन्हे

जळगाव जिल्ह्यात थकबाकीमुळं स्मार्ट मीटरद्वारे (Smart Meter) वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही परस्पर वीज जोडणी करून वापर सुरू ठेवणाऱ्या ग्राहकांविरोधात महावितरणने कारवाईचा वेग वाढवला आहे. गेल्या 2 दिवसांत जळगाव शहरातील नाथवाडा, जोशी कॉलनी आणि धरणगाव तालुक्यातील धार येथील 4 ग्राहकांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा, कलम 135 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळं स्मार्ट मीटरच्या माध्यमातून पुरवठा खंडित झाल्यानंतर अनधिकृत जोडणी करणाऱ्यांवर महावितरणची करडी नजर असल्याचं स्पष्ट झालं आहे.

थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा स्मार्ट मीटरच्या माध्यमातून स्वयंचलित पद्धतीने बंद केला जात आहे. मात्र, काही ग्राहकांकडून अधिकृत परवानगी न घेता पुन्हा जोडणी करून वीज वापर सुरू ठेवला जात असल्याचं तपासणीत समोर आलं आहे. अशा प्रकारे वीज वापरणाऱ्या ग्राहकांची माहिती घेऊन महावितरणची पथके तपासणी करत असून अनधिकृत जोडणी आढळताच संबंधितांविरुद्ध थेट पोलिसांत तक्रार दाखल केली जात आहे.

स्मार्ट मीटरचा मंत्री गुलाबराव पाटील यांनाही झटका, घरचे वीज बिल 5 हजारांवरून थेट 20 हजारांवर

जळगाव शहरातील नाथवाडा परिसरात सरूबाई तुकाराम पाटील यांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनधिकृत जोडणी करून वीज वापरल्याचं आढळलं. या प्रकरणात महावितरणचे 7,710 इतकं नुकसान झाल्याचं तपासणीत निष्पन्न झालं. याप्रकरणी सहायक अभियंता साजिद तडवी यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जोशी कॉलनीतील मनीषा विनोद जोशी यांच्या वीज वापराची तपासणी केली असता अनधिकृत जोडणी आढळली. या प्रकरणात महावितरणचे 41,420 नुकसान झाल्याचं समोर आलं असून त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील धार येथेही महावितरणच्या तपासणीदरम्यान 2 प्रकरणे उघडकीस आली. रमेश देविदास बेलदार यांनी अनधिकृत वीज वापर केल्याने 5,620 नुकसान झाल्याचं आढळलं, तर अजय सीताराम बेलदार यांच्या प्रकरणात 4,510 नुकसान झाल्याचं तपासणीत स्पष्ट झाले. या दोन्ही प्रकरणांत कनिष्ठ अभियंता दीपक पाटील यांच्या तक्रारीवरून भारतीय विद्युत कायदा, कलम 135 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महावितरणने स्पष्ट केलं आहे की, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहकांनी स्वतःहून कोणत्याही प्रकारे वीज जोडणी करण्याचा प्रयत्न करू नये. अशा अनधिकृत जोडण्यांमुळं केवळ वीज चोरीचा गुन्हा होत नाही, तर तांत्रिक नियमांचं उल्लंघन झाल्याने शॉर्टसर्किट, आग किंवा विजेच्या धक्क्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं थकबाकीमुळे पुरवठा बंद झाल्यास अधिकृत प्रक्रियेतूनच तो पुन्हा सुरू करून घेण्याचं आवाहन महावितरणने केलं आहे.

विशेष म्हणजे, खंडित झालेल्या ग्राहकाला शेजारी किंवा अन्य व्यक्तीने अनधिकृत पद्धतीने वीजपुरवठा उपलब्ध करून दिल्यास मदत करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळं स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ‘जुगाड’ करून वीज वापरणाऱ्या ग्राहकांसोबतच त्यांना अनधिकृत जोडणी करून देणाऱ्यांनाही आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागू शकतं.

Exit mobile version