Crowd On Delhi Mumbai Railway Station : दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर घरी जाणाऱ्या प्रवाशांनी देशभरातील रेल्वे स्थानकांवर अक्षरशः प्रचंड गर्दी केली आहे. दिल्ली, मुंबई, सूरत, झांसी ते पटना अशा सर्व प्रमुख शहरांतील स्थानकांवर प्रवाशांचा महापूर उसळलेला दिसतो आहे. लोक आपल्या गावी जाण्यासाठी 12 तास आधीपासूनच रेल्वे स्टेशनवर रांगा लावत आहेत.
शनिवारी गुजरातमधील सूरतच्या उधना रेल्वे स्टेशनवर पाहण्यासारखं दृश्य होतं. स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 पासून तब्बल दोन किलोमीटरपर्यंत प्रवाशांची रांग लागली होती. अनेक प्रवासी लिम्बायत परिसरापर्यंत रांगेत (Train) उभे होते. काही जण मैदानातच (Diwali) रात्रीपासून थांबलेले होते. यात लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध प्रवासीही मोठ्या संख्येने होते. हे सर्व लोक रविवारी निघणाऱ्या विशेष आणि साप्ताहिक गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी 12 तास आधीपासूनच आपली जागा निश्चित (Mumbai Railway Station) करण्याच्या प्रयत्नात होते.
दिल्ली व उत्तर भारतातील परिस्थिती
दिल्लीच्या नवी दिल्ली रेल्वे स्टेशनपासून देशभरातील इतर प्रमुख स्थानकांवर सुद्धा अशीच प्रचंड गर्दी दिसत आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये सर्वसाधारण डब्यांपासून ते आरक्षित डब्यांपर्यंत सर्वत्र प्रवाशांची झुंबड उडाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी दिल्ली स्टेशनला भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, आज पीक रशचा दिवस आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त टिकिट काउंटर, प्रवासी सहाय्यता केंद्रे, आणि होल्डिंग एरिया तयार करण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालयानुसार, 1.75 लाख प्रवासी शनिवारी दिल्ली स्थानकावर पोहोचले, ज्यापैकी 75 हजार नॉन-रिझर्व्ह प्रवासी होते.
मुंबईतही प्रचंड गर्दी
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस वरही शनिवारपासूनच प्रवाशांचा ओघ वाढला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि व्यवस्थेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रत्येक गाडीकरिता स्वतंत्र बॅरिकेटेड क्षेत्र (खटाल) तयार करण्यात आले आहे. आरपीएफ आणि जीआरपी जवान सतत गस्त ठेवत आहेत. प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमण्यात आले आहेत. रेल्वेने यंदा १२,००० विशेष गाड्या सुरू केल्या आहेत, जेणेकरून सुट्टीसाठी घरी जाणाऱ्या लोकांना अडचण येऊ नये.
दिल्ली-एनसीआरमध्ये महाजाम
दिवाळीपूर्वी दिल्ली-एनसीआर परिसरातही वाहतुकीचा गोंधळ उडाला आहे. नोएडा, गुरुग्राम, आग्रा एक्सप्रेस-वे अशा प्रमुख मार्गांवर गाड्यांची लांबच लांब रांग दिसत आहे. प्रवाशांना रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचायलाच तासन्तास लागले. त्यातच दिल्लीतील हवा प्रदूषणाचा स्तर 300 एआयक्यूपर्यंत पोहोचला असून, अनेक स्थानकं ‘रेड झोन’मध्ये गेली आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचे पावले
रेल्वे प्रशासनाने सांगितले की, होल्डिंग एरिया तयार करून प्रवाशांना क्रमबद्ध प्रवेश दिला जातोय. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर FIR दाखल करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी गर्दी अधिक आहे, तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट नियंत्रण हाती घेतले आहे.
झांसी स्टेशनवरही अफाट गर्दी
झांसी ते गोरखपूर मार्गावरील गाड्यांमध्येही प्रचंड प्रवासी वाढ झाल्याने स्टेशन गजबजले आहे. काही जण खिडकीतून आत शिरताना दिसतात तर काही धक्काबुक्की करत आत प्रवेश करत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून डीआरएम आणि आरपीएफ अधिकारी स्वतः मैदानात उतरले आहेत.