मविआचा आश्वासक चेहरा शरद पवारच; राज्यसभेसाठीसाठी तिन्ही पक्षांची पवारांनाच पसंती
महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी, काँग्रेस, ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या जागेबाबत एकमत
Mahavikas Aghadi’s seal of approval for Pawar for Rajya Sabha : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची राजकीय चर्चा चांगलीच रंगली आहे. येत्या 16 मार्च रोजी देशातील 10 राज्यांतील एकूण 30 जागांसाठी मतदान होणार असून त्यापैकी महाराष्ट्रातील सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. सध्याच्या संख्याबळाचा विचार करता महायुतीचे सहा आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो, असे प्राथमिक गणित मांडले जात आहे. मात्र या एका जागेसाठी महाविकास आघाडीत पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू होत्या.
दरम्यान, भाजपने आपल्या चार उमेदवारांची अधिकृत घोषणा करत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या एकमेव जागेसाठी अखेर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे समोर येत आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी, काँग्रेस, ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या जागेबाबत एकमत केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाकडूनही पवार यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी पवार यांना पाठिंबा देण्याच्या निर्णयाला मान्यता दिल्याची माहिती आहे.
त्याचप्रमाणे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पवार यांच्या नावाला समर्थन दिल्याचे कळते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना दिलेल्या माहितीनुसार, पक्षश्रेष्ठींकडून फोनद्वारे पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय कळवण्यात आला आहे. महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा लवकरच संयुक्त पत्रकार परिषदेत केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी या एकमेव जागेसाठी काँग्रेसनेही दावा केला होता. काँग्रेसकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. मात्र व्यापक राजकीय समीकरण आणि राष्ट्रीय पातळीवरील संदेश लक्षात घेता अखेर पवार यांच्या नावावर एकमत झाल्याचे चित्र आहे.
बाप काढायचा अधिकार कुणी दिला?’ अधिवेशनात भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात खडाजंगी
राजकीय विश्लेषकांच्या मते, शरद पवार यांचा राज्यसभा प्रवेश हा केवळ एक निवडणूक निर्णय नसून आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा संदेश मानला जात आहे. पवार यांचा दीर्घ राजकीय अनुभव, दिल्लीतील नेटवर्क आणि संसदीय कामकाजातील पकड यामुळे विरोधकांना भक्कम आवाज मिळणार असल्याचे मानले जाते.
सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीला सहा जागा मिळण्याची शक्यता असली, तरी उर्वरित एकमेव जागेसाठी महाविकास आघाडी एकसंघ राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदानाच्या दिवशी कोणतीही अनपेक्षित राजकीय कलाटणी होऊ नये यासाठी दोन्ही बाजूंनी आमदारांवर लक्ष ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकूणच, 16 मार्च रोजी होणारी राज्यसभा निवडणूक ही केवळ आकड्यांची लढाई नसून प्रतिष्ठेची आणि भविष्यातील राजकीय दिशेची कसोटी ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात या निकालाचे दूरगामी परिणाम दिसून येऊ शकतात.
