ब्लॅक सी परिसरात व्यापारी जहाजांसाठी वाढला धोका; भारतीय नागरिकांना सरकारचा सावधगिरीचा इशारा

ब्लॅक सी मार्गांवर नोकरी स्वीकारण्यापूर्वी सुरक्षा परिस्थितीचे सखोल मूल्यांकन करण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 51

Increased risk for merchant ships : ब्लॅक सी परिसरातील वाढत्या सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भरतोय नागरिकांसाठी महत्वाची सूचना जारी केली आहे. संघर्षग्रस्त सागरी भागांमध्ये विशेषतः ब्लॅक सी आणि त्यालगतच्या समुद्री मार्गांवर नोकरी स्वीकारण्यापूर्वी सुरक्षा परिस्थितीचे सखोल मूल्यांकन करण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. संघर्षग्रस्त भागातून प्रवास करणाऱ्या किंवा तेथे कार्यरत असलेल्या व्यापारी जहाजांवर नोकरी करू इच्छिणाऱ्या भारतीयांनी तेथील संभाव्य धोके समजून घेतल्याशिवाय कोणतीही नोकरी स्वीकारू नये, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवड्यात ब्लॅक सी परिसरात व्यापारी जहाजांवर झालेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर ही सूचना जारी करण्यात आली आहे. अलीकडील हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला, तर 19 जुलै रोजी झालेल्या अशाच एका हल्ल्यात चार भारतीयांनी आपला जीव गमावला होता. या घटनांमुळे केंद्र सरकारने गंभीर चिंता व्यक्त करत भारतीय नाविक आणि सागरी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे की, सुरू असलेल्या संघर्षामुळे ब्लॅक सी आणि त्याच्या आसपासच्या समुद्री क्षेत्रांतील परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे. या भागातून प्रवास करणाऱ्या किंवा येथे कार्यरत असलेल्या व्यापारी जहाजांना मोठ्या सुरक्षा धोक्यांचा सामना करावा कागत असून मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांचा धोका सातत्याने वाढत आहे. एप्रिल 2026 पासून व्यापारी जहाजांवरील अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे सरकारने नमूद केले आहे. या वाढत्या धोक्यांमुळे निष्पाप नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचं देखील सरकारने अधोरेखित केले आहे.

मुख्यमंत्री केंद्रात जाणार?…, स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण चर्चेला एका वाक्यात दिलं उत्तर

सरकारने भारतीय नागरिकांना कोणतीही नोकरी स्वीकारण्यापूर्वी जहाजाचा नियोजित मार्ग, जहाज कोणत्या बंदरावर थांबणार आहे. जहाजावरील सुरक्षा व्यवस्था, विमा संरक्षणाची व्याप्ती तसेच आपत्कालीन परिस्थितीत अवलंबली जाणारी कार्यपद्धती याबाबत जहाज मालक आणि संचालन करणाऱ्या कंपन्यांकडून संपूर्ण माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच रोजगाराच्या अटी आंतरराष्ट्रीय सागरी मानकांनुसार आहेत की नाहीत, याची खात्री करून घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचार, सुरक्षित स्थलांतर, स्वदेशी परत पाठवण्याची व्यवस्था आणि नुकसानभरपाई यासंदर्भातील तरतुदी रोजगार करारात स्पष्टपणे नमूद असणे आवस्श्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे. याशिवाय परदेशात कार्यरत असलेल्या भारतीय नाविकांनी आपल्या प्रवासाची आणि मुक्कामाची माहिती कुटुंबियांना नियमितपणे देत राहावी तसेच त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

कांसुलर मदतीची आवश्यकता भासल्यास संबंधित देशातील भारतीय दूतावास किंवा वाणिज्य दूतावासाशी तात्काळ संपर्क साधावा, असे देखील परराष्ट्र मंत्रालयाने सूचनेत स्पष्ट केले आहे. वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सरकारने अधोरेखित केले असून ब्लॅक सी परिसरात नोकरी स्वीकारताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा पुरुच्चार केला आहे.

follow us