24 जुलैला CJP चा देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाचा एल्गार, देशभरातील आंदोलनकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न

वातावरण तापले असताना कॉकरोच जनता पार्टीने 24 जुलै 2026 रोजी देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन केले आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (83)

A clarion call for a nationwide peaceful protest : देशभरात नीट परीक्षा, पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाई आणि आंदोलनकर्त्यांवरील लाठीमार या मुद्द्यांवरून वातावरण तापले असताना कॉकरोच जनता पार्टीने 24 जुलै 2026 रोजी देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन केले आहे. प्रत्येक जिल्हा, एक दिवस, एकाच मागणी या घोषवाक्यासह देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आंदोलन करण्याचा निर्णय पक्षाने जाहीर केला आहे.

कॉकरोच जनता पार्टीने प्रसिद्ध केलेल्या पोस्टरनुसार, देशभरात आंदोलनादरम्यान कथित पोलीस अत्याचारांना सामोरे जावे लागलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांप्रती ऐक्य व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात वेग येत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आणि युवकांचे आंदोलन सुरू असून, त्यावेळी झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केंद्र सरकारवावर जोरदार टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता आंदोलनाचा विस्तार जिल्हा पातळीपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोस्टरमध्ये सर्व विद्यार्थी संघटना, युवक संघटना, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांनी एकत्र येऊन आंदोलनाचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करावे, तसेच आंदोलनाचे व्यवस्थापन आणि समन्वय सर्वांनी मिळून करावा, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या सार्वजनिकरित्या वाचून दाखवण्यात येणार आहेत. तसेच आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांप्रती आणि नागरिकांप्रती एकजूट व्यक्त करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित अत्याचारांची चौकशी व्हावी आणि जबाबदारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येण्याची शक्यता आहे.

‘राजीनामा नको, मोदी, शाहांना बदलून टाकणार’; भर पावसात आंबेडकर मुंबईच्या रस्त्यावर, राज्यात कडकडीत बंद

कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनासाठी आवश्यक असलेली सविस्तर कार्यपद्धती, निवेदनाचा नमुना, प्रसिद्धी साहित्य आणि मार्गदर्शक सूचना आपल्या संकेतस्थळावर उपलब्द्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाच स्वरूपात आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण असल्याचा दावा पक्षाने केला असून आंदोलनकर्त्यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आले आहे. देशातील युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी देखील लोकशाही मार्गाने आपला आवाज बुलंद करण्यासाठी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे देखील या पोस्टरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, नीट परीक्षा आणि निकाल प्रक्रियेवरून निर्माण झालेला वाद, विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईचे आरोप यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशा परिस्थितीत 24 जुलै रोजी होणाऱ्या या देशव्यापी आंदोलनाकडे विद्यार्थी, पालक, राजकीय पक्ष आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

इन्कलाब जिंदाबाद आणि भारत माता की जय या घोषणांसह प्रसिद्ध करण्यात आलेल्या या आवाहनामुळे येत्या काही दिवसांत आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 24 जुलै रोजी देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात काय प्रतिसाद मिळतो आणि या आंदोलनाचा पुढील राजकीय व सामाजिक घडामोडींवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us