टॉपमधील नऊ कंपन्यांचे मार्केट कॅप पावणे तीन लाख कोटींनी घटले, कोणत्या कंपन्यांना बसला झटका ?
Market cap - सेन्सेक्समधील टॉप 10 सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांपैकी 9 कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलात (मार्केट कॅप) तब्बल ₹2.74 लाख कोटींची घट झाली आहे.
Market cap of India’s top 9 firms down : जागतिक कारणे आणि कंपन्यांच्या घटलेल्या नफ्यामुळे मागील आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण झालीय. सेन्सेक्समधील टॉप 10 सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांपैकी 9 कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलात (मार्केट कॅप) तब्बल ₹2.74 लाख कोटींची घट झाली आहे. खासगी क्षेत्रातील अव्वल क्रमांकाच्या एचडीएफसी (HDFC) बँकेला सर्वाधिक फटका बसलाय. दरम्यान हिंदुस्तान युनिलिव्हर ही एकमेव कंपनी ठरली. या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे.
गेल्या आठवड्यातील पाच दिवसांच्या कामकाजात सेन्सेक्स 2,091.68 अंकांनी (2.67%) घसरला आहे. तर निफ्टी 566.85 अंकांनी (2.32%) खाली आली आहे. या घसरणीचा परिणाम देशातील आघाडीच्या कंपन्यांच्या बाजारमूल्यावर दिसून आला आहे. एचडीएफसी (HDFC) कंपनीला सर्वाधिक फटका बसला आहे.
एचडीएफसीचा मार्केट कॅप 1,18,383.91 कोटींनी घसरला आहे. तो 11,43,985.90 कोटींवर आला आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 65,429.82 कोटींची घट झाली आहे. या कंपन्यांचे मार्केट कॅप 17,29,661.44 कोटींवर आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मार्केट कॅपमध्ये 26,814.94 कोटींची घट झाली आहे. या बँकेचे मार्केट कॅप 9,36,953.84 कोटींवर आले आहे. बजाज फायनान्सचे मार्केट कॅप 26,802.74 कोटींनी घटले आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 6,30,471.54 कोटींवर आले आहे. तर एलआयसीच्या मार्केट कॅपमध्ये 15,116.74 कोटींची घट झाली असून, आता एलआयसीचे मार्केट कॅप 5,33,007.56 कोटींवर आले आहे.
ICICI बँकचे मार्टेक कप ₹6,223.84 कोटींनी घसरूण 10,28,217.93 कोटींवर आले आहे. भारती एअरटेलचे मार्केट कॅप 6,021.64 कोटींनी घटून 11,85,046.13 कोटींवर आले आहे. आयटी कंपनीचे टीसीएसचे मार्केट कॅपमध्ये 5,191.95 कोटींची घट झाली असून, मार्केट कॅप 8,15,480.75 कोटींवर आले आहे. तर लार्सन अँड टुब्रो (L&T)चे मार्केट कॅप 4,092.79 कोटींनी घसरूण ते ₹5,20,747.89 कोटींवर आले आहे.
हिंदुस्तान युनिलिव्हरची मात्र वाढ
या घसरणीच्या वातावरणात हिंदुस्तान युनिलिव्हरच्या मार्केट कॅपमध्ये 152.73 कोटींची वाढ झाली असून ती ₹5,03,928.59 कोटींवर पोहोचली.
सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांची क्रमवारी
बाजार भांडवलाच्या दृष्टीने रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वाधिक मूल्यवान कंपनी कायम राहिली. त्यानंतर अनुक्रमे भारती एअरटेल, HDFC बँक, ICICI बँक, SBI, TCS, बजाज फायनान्स, LIC, L&T आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांचा क्रम लागतो.