मी स्वतः मध्यस्थी केली; सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील संवादाबाबत शरद पवारांचा मोठा खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि त्या चर्चेचाच परिणाम म्हणून आज शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला, असा दावा शरद पवार यांनी केला.

  • Written By: Published:
Untitled Design   2026 07 25T175918.770

Sharad Pawar’s major revelation : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर विविध राजकीय नेते आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच अध्यक्ष शरद पवार यांनी एक महत्वाचा खुलासा केला आहे. आंदोलक विद्यार्थी आणि केंद्र सरकार यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि त्या चर्चेचाच परिणाम म्हणून आज शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला, असा दावा शरद पवार यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे कौतुक केले आणि हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय असल्याचे म्हटले. आंदोलकांच्या मागणीनुसार केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा दिला. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक पाठबळ दिलं, त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मी आभार मानतो, असे शरद पवार म्हणाले.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती देत पडद्यामागील घडामोडींवर देखील भाष्य केले. आंदोलन तीव्र होत असताना सरकार आणि विद्यार्थी यांच्यातील संवादाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आपण पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. युवा पिढीने शांततेने आणि संयमाने आपल्या भावना देशातील नेतृत्वाच्या समोर मांडल्या आणि त्याला यश आले. मी स्वतः पंतप्रधानांना भेटलो. त्यांना विनंती केली की, लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते. संवाद न ठेवण्याचे दुष्परिणाम होत असतात. तुम्ही संवाद सुरू केला पाहिजे. एक तर राजीनामा घेतला पाहिजे किंवा त्यांचे म्हणणे काय आहे हे ऐकून घेतले पाहिजे, असे आपण पंतप्रधानांना सांगितल्याचे शरद पवार यांनी नमूद केले.

दिल्लीत मोठा राजकीय भूकंप, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अन् देवेंद्र फडणवीसांची दिल्लीवारी; पडद्यामागे काय शिजतंय?

पुढे बोलताना ते म्हणाले, त्यासाठी तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळ आणि तुमचे दोन-तीन सहकारी यांच्याशी चर्चा करा. अभिजित आणि त्यांचे सहकारी यांच्याशी आम्ही बोलणे केलेले आहे. त्यांना देखील आम्ही सांगितलेलं आहे की, सरकार तुमच्याशी सुसंवाद ठेवायला तयार असेल. बोलायचे नाही असा हट्ट धरू नका. असे मी पंतप्रधान मोदींना सांगितले आणि सुदैवाने त्यांची बोलायची तयारी होती.

या संवादाचा सकारात्मक परिणाम झाल्याचा दावा करत शरद पवार म्हणाले, माझं जे काही नरेंद्र मोदींसोबत बोलणं झालं, त्याचा परिणाम आज दिसला आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आज झाला आहे. दरम्यान आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापराबाबत देखील शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा अभिमानदं करताना त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मी युवा पिढीचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. पण नव्या पिढीला हाताळत असताना लाठीमार, अश्रूधूर हे प्रकार जर टाळले असते तर अधिक चांगले दिसले असते, असे शरद पवार यांनी म्हटले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे चित्र असले तरी आंदोलनातील इतर मागण्यांबाबत सरकारची भूमिका काय असणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या चर्चेचा उल्लेख करत शरद पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरूवात झाली आहे.

follow us