मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक; बंदुकधारी बॉडीगार्डसह 24 वर्षीय तरुण ताब्यात
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पुढील तपास मुंबई पोलीस क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील NMACC परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमादरम्यान सुरक्षेचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कार्यक्रमस्थळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या 24 वर्षीय रोहन पारेख याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे पारेख स्वतःला पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत होता आणि त्याच्याकडे PMO चे बनावट ओळखपत्र आढळल्याची माहिती आहे.
सुरक्षा व्यवस्थेतील जवानांना पारेखच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. यावेळी त्याने दाखवलेले PMO चे ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आले. एवढेच नव्हे, तर पारेखसोबत एक खासगी बॉडीगार्डही असल्याचे तपासात समोर आले. या बॉडीगार्डकडे बंदूक आढळल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली.
PM Modi : पंतप्रधान मोदींचा रॉकस्टार अवतार! OG अन् 4K व्हिडिओ Gen Z चे मत बदलणार?
पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी SPG आणि मुंबई पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात असताना बनावट ओळखपत्राच्या आधारे एक व्यक्ती कार्यक्रमस्थळी पोहोचल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पारेख आणि त्याच्या बॉडीगार्डला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली असून, या दोघांचा कार्यक्रमस्थळी प्रवेश नेमका कसा झाला, याचाही तपास केला जात आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पुढील तपास मुंबई पोलीस क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे. पारेखने बनावट PMO कार्ड का तयार केले, ते त्याला कोणी उपलब्ध करून दिले आणि पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळी पोहोचण्यामागे त्याचा नेमका उद्देश काय होता, या प्रश्नांची उत्तरे तपासातून शोधली जात आहेत.