नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान आहेत काय?, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यावरून राऊतांचा घणाघात

राष्ट्रीय पुरस्कारांची परंपरा आणि त्यामागील राष्ट्रीय महत्त्व लक्षात घेता हा सोहळा दिल्लीतच झाला पाहिजे, अशी भूमिका राऊत यांनी मांडली.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 08T101455.606

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा (Shivsena) यंदा प्रथमच राजधानी दिल्लीबाहेर गुजरातमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. गेली 72 वर्षे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसारखा महत्त्वाचा सोहळा देशाच्या राजधानीत होत असताना तो गुजरातमध्ये नेण्याची गरज काय, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

राष्ट्रीय पुरस्कारांची परंपरा आणि त्यामागील राष्ट्रीय महत्त्व लक्षात घेता हा सोहळा दिल्लीतच झाला पाहिजे, अशी भूमिका राऊत यांनी मांडली. देशाचा अभिमान आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या गोष्टी एका राज्याकडे वळवल्या जात असल्याचा आरोप करत, कलाकारांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी गुजरातला का जावे, असा प्रश्न त्यांनी केला. तसेच देशाविषयी स्वाभिमान असेल तर कलाकारांनी गुजरातला जाऊ नये, असे आवाहनही राऊत यांनी केले.

मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द

दरम्यान, राष्ट्रीय सोहळे राजधानीत न होता गुजरातमध्ये आयोजित करण्यामागे आगामी निवडणुकीचा राजकीय संदर्भ आहे का, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. कोणत्याही एका राज्यावर आपली टीका नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला. गुजरात हेच देशातील सर्वात महत्त्वाचे राज्य असल्यासारखी आणि इतर राज्यांचे महत्त्व कमी करण्याची मानसिकता पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कारभारात दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनांचा राजकीय हत्यार म्हणून वापर होत असल्याच्या टीकेवरही राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षाने आंदोलन करायचे नाही तर काय करायचे, असा सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या जुन्या आरोपांची आठवण करून दिली. निवडणुकांच्या काळात ‘गाडीभर पुरावे’ आणण्याचे दावे करण्यात आले होते, त्या पुराव्यांचे पुढे काय झाले, असा सवाल करत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवरही पलटवार केला.

follow us