सात पिढ्या राजकारणात असल्या तरी मी जरांगे आहे, उखडून टाकू; विखे पाटलांना जरांगेंचा थेट इशारा

मराठा समाजाच्या प्रश्नावर आपण मागे हटणार नसल्याचे स्पष्ट करत जरांगे यांनी 12 तारखेच्या बैठकीचा निर्धार कायम असल्याचे सांगितले.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 08T155821.552

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Patil) यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘तुमच्या सात पिढ्या राजकारणात असल्या तरी मी जरांगे आहे, उखडून टाकू’, अशा शब्दांत जरांगे यांनी विखे-पाटलांना थेट इशारा दिला. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली.

राज्य सरकारचे आता कोणतेही शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत येणार नसल्याचे विखे-पाटील यांनी म्हटल्यानंतर जरांगे संतप्त झाले. विखे-पाटील यांनी वर्षभर मराठा समाजाला आश्वासने देऊन नाचवले आणि अखेर दगा दिला, असा आरोप त्यांनी केला. मराठ्यांच्या प्रश्नावर जबाबदारी स्वीकारण्याऐवजी सरकारमधील नेते एकमेकांचे गुणगान करण्यात व्यस्त असल्याची टीकाही त्यांनी केली.

मराठ्यांसाठी तू कलंक, अंतरवालीत ये नाहीतर नको येऊ; मनोज जरांगे पुन्हा विखेंवर संतापले

‘तुम्ही अंतरवालीमध्ये येऊ नका, तुम्हाला कोण बोलावत आहे? सरकारला समजून घ्यायला सरकार बाप आहे का?’ असा सवाल करत जरांगे यांनी विखे-पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेत नसून केवळ दिखावा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नगर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी विखे-पाटील दगाबाज असल्याचे आपल्याला यापूर्वी सांगितले होते, असा दावाही जरांगे यांनी केला.

दरम्यान, मराठा समाजाच्या प्रश्नावर आपण मागे हटणार नसल्याचे स्पष्ट करत जरांगे यांनी 12 तारखेच्या बैठकीचा निर्धार कायम असल्याचे सांगितले. सरकारने जेलमध्ये टाकायचे असेल तर टाकावे, पण आंदोलनाची भूमिका बदलणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ‘तुमच्या सात पिढ्या राजकारणात असल्या तरी मी जरांगे आहे, उखडून टाकू’, या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आणि जरांगे यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

follow us