Download App

Dada Bhuse : आम्ही सभा घ्यायचो तेव्हा थेट माईक हातात घ्यायचे अन् आता…

नाशिक : आम्ही सभा घ्यायचो तेव्हा थेट माईक हातात घ्यायचे, अन् आता नेत्यांना तळ ठोकावा लागत असल्याचा टोला शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी टोला लगावला आहे. आज उद्धव ठाकरे यांची मालेगावात पार पडणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील अनेक आजी-माजी नगरसेवकांनी, महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. यावेळी दादा भुसेंनी उद्धव ठाकरेंच्या सभेवर टोलेबाजी केलीय.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्या विरोधात पुणे महिला काँग्रेसचे मूक आंदोलन

दादा भुसे म्हणाले, आधीच्या काळात कधीच स्वत: मोठा नेता समजत असलेल्या नेत्यांना एवढ्या दिवस तळ ठोकून बसावं लागत नव्हतं. आम्ही सभेचं आयोजन करायचो तेव्हा नेते थेट येऊन माईक हातात घेत होते, आता राज्यभरातून लोकांना आणण्यात येत असून हा मालेगावचा अपमान असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केलीय.

तसेच संजय राऊत यांच्या बोलण्याला आता जनता कंटाळली आहे. उद्धव ठाकरे मालेगावात येत आहेत तर त्यांचं मी स्वागत करतो. लोकशाहीत प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळे मला वाईट वाटण्याच कारण नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

राज ठाकरेंचा आज पुणे दौरा, अनधिकृत मशिदीबद्दल बोलणार?

आज मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहेत. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हीच शिकवण आम्हाला बाळासाहेब आणि आनंद दिघेसाहेबांनी दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आम्ही सर्वसामान्य जनतेत काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे लोकं प्रवेश करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

झोपडीतल्या तळागाळातल्या शिवसैनिकांच्या जीवावरच शिवसेना उभी असून पोपटपंची करुन शिवसेना उभी राहिलेली नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. यापुढील काळात आणखी पक्षप्रवेश दिसणार असल्याचाही खुलासाही त्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, आज मालेगावात उद्धव ठाकरे यांच्या शिवगर्जना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह विनायक राऊत काही दिवसांपासून मालेगावात तळ ठोकून होते. या सभेसाठी जवळपास एक लाख कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था करण्यात आली असून सभेत ठाकरी तोफ कोणावर धडाडणार? हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

Tags

follow us