Dagdusheth Ganpati gets ‘A’ class tourist area status : पुण्यातील प्रसिद्ध आणि लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर संस्थानाला राज्य सरकारकडून अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून परिसराच्या सर्वांगीण विकासासह भाविकांच्या सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून ही घोषणा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, ॥ गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ ॥ मला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने या परिसराचा सर्वांगीण विकास होणार आहे.
॥ गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ ॥
मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती या संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
यामुळे एकूणच या क्षेत्राचा एकूणच तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगिण विकास होणार आहे.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 17, 2026
या दर्जामुळे संस्थान परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा तसेच भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे. देशभरासह परदेशातून देखील मोठ्या संख्येने पर्यटक पुण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सव काळातच नव्हे तर वर्षभर दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी लाखो भक्त पुण्यात दाखल होत असतात. त्यामुळे धर्ममिक पर्यटनाच्या माध्यमातून शहराच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी; स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी 18 जूनला मतदान
गेल्या अनेक वर्षांपासून संस्थानाला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर राज्य सरकारच्या निर्णयामुळे हा प्रयत्न यशस्वी ठरला असून गणेशभक्तांमध्ह्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे स्थानिक व्यापार, हॉटेल व्यवसाय, पर्यटन सेवा आणि रोजगारनिर्मितीला देखील चालना मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल आणि तीर्थक्षेत्र म्हणून या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होईल. भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होऊन पुण्याच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वैभवात भर पडणार आहे.
