Download App

“कोणी मागणी केली रे” : काटेवाडीच्या सरपंचांना फोन करत अजितदादांचा दरडावून सवाल

मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक तर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची साथ सोडावी, अशी मागणी काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्याच्या बातम्या आज काही वृत्तपत्रांमध्ये झळकल्या होत्या. (DCM Ajit Pawar call Sarpanch of Kate wadi and ask about resign demand)

मात्र या बातम्यांनंतर आपण लगेचच गावच्या सरपंचांना फोन करुन माहिती घेतली, मात्र ती केवळ एका व्यक्तीची मागणी असल्याचे आपल्याला सांगण्यात आले, त्यामुळे त्याला एवढे महत्व देत नसल्याचे अजित पवार म्हणाले. आज राज्यातील मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारच्यावतीने एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारी मंत्री, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी काटेवाडीच्या प्रश्नाला उत्तर दिले.

काय म्हणाले अजित पवार?

काटेवाडीचा विषय का काढला, माझं गाव आहे म्हणूनच काढला ना? अखंड महाराष्ट्रात 40 हजार गावं आहेत, त्याचा कुठला विषय निघाला नाही. मी ताबडतोब सकाळी सरपंचाला फोन केला, म्हंटलं कोणी रे तिथं मागणी केली, तो म्हणाला, दादा आम्ही कोणीही तिथं नव्हतो. एक व्यक्ती त्याने तशी मागणी केली. आता एवढ्या मोठ्या राज्यात 14 कोटी जनतेपैकी एकाने ती मागणी केली. पण त्याला एवढा अधिकार नाही. तो कोण गावचा सरपंच नाही, उपसरपंच नाही किंवा कोणतरीही प्रमुख असता तर त्यावर काही तरी उत्तर दिलं असतं, असं म्हणत अजित पवार यांनी काटेवाडीच्या प्रश्नावर उत्तर दिलं.

रविवारी (३ सप्टेंबर) आंदोलकांनी बारामती-इंदापूर महामार्ग सुमारे अर्धा तास रोखून धरला. हे आंदोलन शांततेत पार पडले असले तरी आंदोलकांच्या भावना तीव्र होत्या. काटेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य स्वप्निल काटे बोलताना म्हणाले, “जालना येथील घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व मराठा समाजाच्या वतीने येथे जमलो होतो. या ठिकाणी शिंदे व फडणवीस यांचे फलक झळकावून निषेध केला. या घटनेला सर्वस्वी शिंदे व फडणवीस हे जबाबदार आहेत. आम्ही समस्थ काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने अजितदादांना एकच विनंती करतो, की त्यांनी एकतर फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची साथ तरी सोडावी. आम्ही सकल मराठा समाज तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहोत.

Tags

follow us