Ajit pawar : ठाणे एक्सप्रेस रेल्वेमध्ये बसण्याच्या जागेवरून प्रवाशांत वाद झाला. पुढे या प्रकरणाला वेगळ वळण लागलं. एका वृद्धाला मारहाण करण्याची घटना घडली होती. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटू लागले असून संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे अजितदादांनी ट्विट करत सांगितले.
इगतपुरी भागात दोन दिवसांपूर्वी रेल्वे प्रवासा दरम्यान एका वृद्ध प्रवाशाला संशयाच्या आधारावर मारहाण करण्यात आल्याची घटना समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत आज मी संबंधित रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला असून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत आणि अशा असामाजिक घटकांना आमच्या महायुती सरकारकडून कोणताही थारा मिळणार नाही.
Ajit Pawar: आता ‘ही’ चूक पुन्हा होणार नाही; लोकसभेला कंबर मोडली, अजित पवारांची जाहीर माफी
जळगाव येथील अश्रफ अली सय्यद (72) दोन दिवसांपूर्वी धुळे ते सीएसएमटी एक्सप्रेसने कल्याणला मुलीकडे चालले होते. रेल्वेत मात्र बसण्याच्या जागेवरून अन्य प्रवाशांबरोबर वाद झाला. नंतर ही रेल्वे कल्याण रेल्वे स्टेशनवर आली. येथे त्यांना उतरायचे होते. मात्र आरोपींनी त्यांना उतरू दिले नाही. त्यांच्याकडे गोमांस असल्याचा संशय घेत त्यांना मारहाण केली. पुढे ते ठाणे रेल्वे स्टेशनला उतरून कल्याणला गेले, अशी माहिती पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली.
या घटनेचा व्हिडिओ रेल्वेतील काही प्रवाशांनी काढला होता. नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओची पोलिसांनीही तातडीने दखल घेतली. पोलिसांनी हालाचाला करत तत्काळ कल्याण गाठले. येथे अश्रफ सय्यद यांच्या मुलीच्या घरी जाऊन जबाब नोंदवण्यात आला. यानंतर पोलिसांनी पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.