मुंबई : “शेवटी ज्याला कुठे न्याय मिळत नाही त्याला आम्हाला न्याय द्यावा लागतो. आता तुम्ही ठरवा न्याय देणार आहात का?” अशी टोलेबाजी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाला आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना चिमटे काढले. विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी आमदार विजय वडेट्टीवर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनपर भाषणात फडणवीस बोलत होते. दरम्यान, फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे आमदार सत्यजीत तांबे यांच्याशी संबंधित आठवण पुन्हा एकदा ताजी झाली. (DCM Devendra Fadnavis indirectly invite Congress MLA Sangram Thopte to join BJP)
वडेट्टीवर यांच्यापूर्वी विरोधी पक्ष नेते म्हणून संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा होती. त्यासाठी थोपटेंनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र पाठवलं असल्याची माहिती देखील समोर आली होती. मात्र अखेरच्या क्षणी विरोधी पक्ष नेतेपदाची माळ वडेट्टीवार यांच्या गळ्यात पडली. यापूर्वी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडल्यानंतर त्यांच्या जागी थोपटे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. मात्र अखेरपर्यंत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली नाही. याच सर्व घडामोडींचा संदर्भ घेत फडणवीस यांनी सभागृहात टोलेबाजी केली.
फडणवीस म्हणाले, सकाळी आज उल्लेख झाला, हे खरंय की वडेट्टीवार यांचं नाव घोषित करता करता उशीर झाला. पण आता आमच्या संग्राम भाऊच नेमकं काय होणार आहे मला माहित नाही. त्यांचं नेहमी असं का होतं? मागच्या वेळेस नानाभाऊंनी अध्यक्ष पद सोडून दिलं. त्यानंतर आम्ही शेवटपर्यंत ऐकत होतो संग्राम भाऊ होणार.. संग्राम भाऊंचे नाव येणार, संग्राम भाऊंची चिठ्ठी झाली आहे, चिठ्ठी निघालेली आहे, चिट्ठीवर सही झालेली आहे, चिठ्ठी दिल्लीहून डिस्पॅच झाली आहे, डिस्पॅच होता होता कुठे अडते? पण ती नाही झाली हे उत्तमच आहे. पण शेवटी ज्याला कुठे न्याय मिळत नाही त्याला आम्हाला न्याय द्यावा लागतो. आता तुम्ही (काँग्रेस) ठरवा न्याय देणार आहात का? अन्यथा आम्ही देऊ, असं म्हणतं फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे थोपटे यांना भाजप प्रवेशासाठी निमंत्रण दिले.
अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांच्याबाबतही देवेंद्र फडणवीस यांचा असाच काहीसा सुर होता. विधान परिषद निवडणुकीपूर्वी काही दिवस आधी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार केली होती. सत्यजीत तांबे यांच्या कामाचे कौतुक करत किती दिवस तुम्ही त्यांना बाहेर ठेवता? असा सवाल विचारला होता. तसंच जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचीही नजर जात असते, असं म्हणाले होते. त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा एबी फॉर्म न जोडता तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवत भाजपच्या मदतीने विजय मिळविला होता.