मंत्रालयातच लाचकांड; मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आदेश, लिपिकाची प्रतिनियुक्ती रद्द

लिपिक राजेंद्र ढेरिंगे यांच्याविरोधात विभागीय चौकशीच नव्हे, तर प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करण्याचे आदेश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design 50

Minister Narhari Jirwal’s order, deputation of clerk cancelled : मेडिकल दुकानाचा परवाना रद्द करण्याची कारवाई टाळण्यासाठी मंत्रालयातच लाच घेतल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लाच घेताना रंगेहाथ पकडले गेलेले लिपिक राजेंद्र ढेरिंगे यांच्याविरोधात केवळ विभागीय चौकशीच नव्हे, तर त्यांची प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करण्याचे आदेश विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.

मंत्रालयाच्या आवारातच घडलेल्या या कारवाईमुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे, लाच ही मंत्र्यांच्या कार्यालयातच घेतल्याची बाब समोर आली असून, मंत्र्यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून पैसे स्वीकारल्याची कबुली संबंधित लिपिकाने दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मंत्री झिरवाळ यांच्यावरही विरोधकांकडून टीकेची झोड उठू लागली आहे.

‘सामना’तून काँग्रेसला कानपिचक्या; छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपूची तुलना पुन्हा चर्चेत

या पार्श्वभूमीवर मंत्री झिरवाळ यांनी भ्रष्टाचाराबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका स्पष्ट करत, विभागातील दक्षता पथकाला सखोल आणि गोपनीय चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित लिपिकाविरोधात वस्तुनिष्ठ व सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राजेंद्र ढेरिंगे हे मूळचे अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी असून, ते सध्या अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.

त्यांची प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करून त्यांना मूळ विभागात परत पाठविण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी सहआयुक्त (दक्षता) तसेच संबंधित पोलीस उपायुक्त यांना पाचारण करण्यात आले असून, लवकरात लवकर सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या घडामोडींमुळे अन्न व औषध प्रशासन विभागातील कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

follow us