मुख्यमंत्रीपदाची ऑफर, शरद पवारांप्रती निष्ठा आणि गमावलेली संधी; भुजबळांच्या वक्तव्यावर पटोलेंची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या एका दाव्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Patole’s reaction to Bhujbal’s statement : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच काँग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलावलं आहे. दिल्ली दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या एका दाव्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
छगन भुजबळ यांनी काल बोलताना, काँग्रेसकडून मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती. मात्र शरद पवारांची साथ सोडायची नव्हती, त्यामुळे मी ती ऑफर स्वीकारली नाही, असा दावा केला होता. याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी भुजबळांच्या राजकीय क्षमतेची दखल घेत, त्यांनी मोठी संधी गमावल्याचं सूचक वक्तव्य केलं.
छगन भुजबळ काय बोलतात आणि त्यांना नेमका कोणता प्रस्ताव होता, याची मला माहिती नाही. त्यामुळे त्या संदर्भात मी अधिक भाष्य करू शकत नाही. मात्र भुजबळ साहेबांकडे नेतृत्वाची क्षमता होती. ते ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना अशी संधी मिळाली असेल, तर ती त्यांनी स्वीकारायला हवी होती. ती संधी त्यांनी गमावली असं मी म्हणेन, असं पटोले म्हणाले.
मोहिते पाटलांसाठी विमानातून उडी मारली पण..,; सोलापुरात उत्तम जानकर-मोहिते पाटील संघर्ष पेटला…
यावेळी त्यांनी देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन थांबवून ती मतं एकत्र आणण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. आज देशासमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे केंद्रातील मोदी सरकारला सत्तेतून बाहेर काढणं आहे. देश विकणाऱ्या या सरकारविरोधात जनमत एकवटणं हा काँग्रेसचा एकमेव अजेंडा आहे आणि त्यासाठी पक्ष सातत्याने काम करत आहे, असं पटोले यांनी स्पष्ट केलं.
दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पटोले यांच्या या विधानांना विशेष महत्त्व प्राप्त झालं असून, आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने त्यांच्या भेटीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.