पुण्यात बंद कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, सारसबाग परिसरात दोन दिवसांपासून उभी होती कार

नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बंद कारमध्ये 30 ते 35 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Untitled Design   2026 10 30T133324.911

Untitled Design 2026 10 30T133324.911

Dead body found in a locked car in Pune : पुण्यातील अत्यंत वर्दळीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारसबाग परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बंद कारमध्ये 30 ते 35 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ही कार गेल्या दोन ते 3 दिवसांपासून एकाच ठिकाणी बेवारस अवस्थेत उभी होती. कारमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्यानंतर स्थानिक नागरिकांना संशय आला आणि हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एक चारचाकी वाहन उभे होते. सुरुवातीला या कारकडे कोणाचे विशेष लक्ष गेले नाही. मात्र, बराच वेळ कार एकाच ठिकाणी उभी असल्याने आणि त्यातून अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला. यानंतर नागरिकांनी वेळ न दवडता खडक पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच खडक पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित कारची पाहणी केली आणि दरवाजा उघडून आत तपासणी केली असता आतील सीटवर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह फुगलेल्या अवस्थेत असल्याचे समोर आले. कार अनेक दिवस बंद अवस्थेत उभी असल्याने मृतदेहातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत होती. या घटनेमुळे परिसरात नागरिकांची गर्दी जमली होती.

महायुतीत वादाची ठिणगी! नवनाथ बनांवर निलेश राणे आक्रमक, शिंदेंनी दिले नेत्यांना महत्त्वाचे आदेश

मृत तरुणाची ओळख शुभम बनसोडे अशी पटली आहे. तो काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याचा मृतदेह नेहरू स्टेडियमसमोरील कारमध्ये कसा आला, तो या ठिकाणी कधी आणि कोणासोबत आला होता, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मृत्यू नैसर्गिक आहे की यामागे अन्य काही कारण आहे, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून संबंधित कार या ठिकाणी कोणी आणि नेमकी कधी आणून उभी केली, याचा शोध घेतला जात आहे. सारसबाग आणि नेहरू स्टेडियम परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी दोन ते तीन दिवस बंद कारमध्ये मृतदेह असल्याचा प्रकार समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शुभम बनसोडे यांचा मृत्यू कसा झाला आणि या घटनेमागे नेमके काय रहस्य आहे, याचा उलगडा आता पोलीस तपासातून होणार आहे.

Exit mobile version