अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील () सोनोरी आणि शिरजगावकसबा परिसरात सलग दोन दिवसांत 2 जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला अखेर वनविभागाने जेरबंद केले. वाघिणीचा शोध घेण्यासाठी चंद्रपूर, नागपूर, पुणे आणि अमरावती येथील संयुक्त पथकाने मोहीम राबवली. रविवारी युवतीवर, तर सोमवारी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ला झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
देऊरवाडा गावातील सोमतीर्थ परिसरात सोमवारी पहाटे वाघिणीने जनावरांच्या गोठ्यात घुसून एका गाईचा बळी घेतला, तर दुसऱ्या गाईला जखमी केले. त्यानंतर जनावरांच्या आरडाओरडीमुळे वाघीण जंगलाच्या दिशेने निघून गेली. काही वेळाने शिरजगावकसबा परिसरातील शेतात काम करणाऱ्या दिनेश शंकरराव आवारे (वय 45, रा. केनीपुरा, शिरजगावकसबा) यांच्यावर तिने हल्ला केला. या हल्ल्यात आवारे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. परिस्थिती लक्षात घेऊन वनविभाग आणि पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवत नागरिकांना घटनास्थळी जाण्यास मनाई केली. दरम्यान, वाघिणीचा माग काढण्यासाठी वनविभागाच्या विविध पथकांनी जंगल परिसरात शोधमोहीम तीव्र केली. अखेर सायंकाळी वाघीण आढळून आल्यानंतर ट्रँक्विलायझर गनच्या साहाय्याने तिला बेशुद्ध करण्यात आले.
वाघीण बेशुद्ध झाल्याची खात्री केल्यानंतर तिला पिंजऱ्यात सुरक्षितपणे ठेवण्यात आले आणि उपचारासाठी नागपूरच्या दिशेने रवाना करण्यात आले. मात्र, नागपूरला नेत असतानाच वाटेत वाघिणीचा मृत्यू झाला. याबाबत उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांनी माहिती दिली असून, दोन दिवसांत 2 मानवी बळी घेतलेल्या वाघिणीच्या जेरबंदीमुळे वनविभागाने अखेर सुटकेचा निःश्वास सोडला.
