Demand for action against those who raised their hands on Sikandar Sheikh : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धेत महाराष्ट्राचा नामवंत मल्ल सिकंदर शेख याच्याशी संबंधित घडलेल्या प्रकाराने कुस्तीविश्वात मोठी खळबळ उडवली आहे. 17 फेब्रुवारी रोजी झालेल्या या 11 लाख रुपयांच्या मानाच्या कुस्तीत सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे आमनेसामने आले होते. या लढतीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच रोहिदास आप्पा यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यामुळे सामना अत्यंत शिस्तबद्ध आणि नियमांनुसार पार पडेल, अशी अपेक्षा होती.
कुस्तीला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही पैलवानांनी ताकदीची झुंज दिली. जवळपास एक तास अखंड चाललेल्या या सामन्यात दोघेही एकमेकांवर भारी पडत असल्याचे चित्र होते. आखाड्यातील वातावरण रंगात आले होते आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आयोजकांकडून स्पष्ट सांगण्यात येत होते की निकाल लागेपर्यंत कुस्ती सोडवली जाणार नाही. समालोचकांनीही वारंवार दोन्ही पैलवानांना गती वाढवण्याचे आवाहन केले. मात्र वेळ पुढे सरकत असतानाही निर्णायक क्षण काही येत नव्हता.
तासभराच्या झुंजीदरम्यान माऊली कोकाटे आक्रमक होताना दिसला. त्याने वारंवार प्रतिस्पर्ध्याच्या मानेवर जोरदार दाब देण्याचा आणि प्रहार करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीला संयम राखणाऱ्या सिकंदर शेखने नियमांच्या चौकटीत राहून प्रतिकार केला. मात्र प्रहारांची तीव्रता वाढल्यावर तोही आक्रमक झाला आणि थेट प्रतिस्पर्ध्याला जाब विचारताना दिसला. याच क्षणी वातावरण तापले.
अजितदादांच्या इच्छेनुसार पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त; CM फडणवीसांची मोठी घोषणा
अचानक माऊली कोकाटेचा एक समर्थक आखाड्यात घुसल्याचा आरोप आहे. त्याने सिकंदर शेखकडे धाव घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. काही क्षणांतच दोन्ही बाजूंचे समर्थक आणि आयोजक आखाड्यात आले आणि मोठी गर्दी झाली. परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसत असताना पंच आणि आयोजकांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही पैलवानांना वेगळे केले.
वाद वाढू नये म्हणून सिकंदर शेखचे गुरू विशाल हारगुळे स्वतः आखाड्यात उतरले आणि दोन्ही पैलवानांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा कुस्ती लावण्यात आली; मात्र इतक्या वेळ चाललेल्या झुंजीनंतरही कोणताही स्पष्ट निकाल लागला नाही. अखेर आयोजकांनी सामना सोडवण्याचा निर्णय घेत दोन्ही पैलवानांना संयुक्त विजेते घोषित केले.
या निर्णयानंतर सोशल मीडियावर कुस्तीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी माऊली कोकाटेवर नियमबाह्य आक्रमकतेचा आरोप करत त्याने कुस्तीऐवजी मारामारीचा पवित्रा घेतल्याची टीका केली. तर काहींनी सुरुवातीपासून बचावात्मक खेळ झाल्यामुळे सामना रंगला नाही, असे मत व्यक्त केले. दरम्यान, सामन्यादरम्यान आखाड्यात घुसून सिकंदरवर धावून गेलेल्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
या सर्व प्रकारात सिकंदर शेखने संयम दाखवला, अशी प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त होत आहे. जर त्यानेही आक्रमक भूमिका घेतली असती, तर गर्दीत मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जाणकारांचे मत आहे. आता आयोजक आणि स्थानिक प्रशासन या घटनेची चौकशी करून पुढील कारवाई करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
