IAS अधिकाऱ्याचा कुटुंबासह चार्टर्ड प्रवास; सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; खर्चावरून विरोधकांचा सवाल

बिहार पर्यटन विभागाचे विशेष सचिव निलेश रामचंद्र देवरे यांनी आपल्या कुटुंबासह चार्टर्ड विमानाने प्रवास केल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला.

  • Written By: Published:
Untitled Design 61

IAS officer’s chartered trip with family : बिहारमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याच्या चार्टर्ड विमान प्रवासावरून सध्या जोरदार राजकीय वाद पेटला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधासभेत झालेल्या खडाजंगीमुळे हा मुद्दा केवळ प्रशासकीय मर्यादेत न राहता राजकीय रंगही घेताना दिसत आहे. बिहार पर्यटन विभागाचे विशेष सचिव निलेश रामचंद्र देवरे यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात नवी दिल्ली पाटणा येथे आपल्या कुटुंबासह चार्टर्ड विमानाने प्रवास केल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आणि या प्रवासाचा खर्च, त्यामागील अधिकृत कारणे आणि नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला.

विधानसभेच्या चालू अधिवेशनात हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. राष्ट्रीय जनता दलाचे आमदार राहुल शर्मा यांनी सभागृहात थेट प्रश्न उपस्थित करत विचारले की, एका आयएएस अधिकाऱ्याला चार्टर्ड विमानाचा प्रवास परवडणारा कसा असून शकतो? हा प्रवास अधिकृत होता की वैयक्तिक? आणि जर अधिकृत नव्हता, तर त्याचा खर्च कोणी उचलला? या प्रश्नांमुळे सभागृहात काही काळ गदारोळ देखील झाला.

या आरोपांवर उत्तर देताना बिहारचे ग्रामीण बांधकाम मंत्री अशोक चौधरी यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री नितीश कुमार, पर्यटन विभागाचे विशेष सचिव नीलेश देवरे आणि स्वतः ते अधिकृत दौऱ्यासाठी जुलै महिन्यात पटणाहून दिल्लीला गेले होते. संबंधित चार्टर्ड विमान दिल्लीहून पटणाला परतणारच होते. त्या वेळी देवरे आणि त्यांचे कुटुंबीय त्या विमानातून पटणाला परतले. त्यामुळे शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, मंत्री चौधरी यांनी याचवेळी देवरे दलित समाजातून येतात म्हणून त्यांना विमानाने प्रवास करण्याचा अधिकार नाही का? असा प्रतिप्रश्न उपस्थित करत वादाला सामाजिक परिमाण दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले. विरोधकांनी हा मुद्दा मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.

रोहित पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने घ्यावी; अजितदादा अपघात प्रकरणात सुप्रिया सुळेंची मोठी मागणी

बिहार काँग्रेसचे प्रवक्ते असित नाथ तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, अधिकाऱ्याच्या प्रवासाविषयी विचारलेल्या सरळ प्रश्नाला थेट उत्तर देण्याऐवजी दलित कार्ड खेळण्याचा प्रयत्न होत आहे. आमचा साधा प्रश्न आहे, त्या प्रवासासाठी अधिकाऱ्याकडून पैसे घेण्यात आले का? की हा प्रवास सार्वजनिक निधीतून झाला? जनतेच्या पैशांचा वापर पारदर्शकपणे व्हायला हवा, असे तिवारी म्हणाले.

आरजेडीचे आमदार राहुल शर्मा यांनीही विधानसभेबाहेर माध्यमांशी बोलताना आपली भूमिका ठाम ठेवली. आयएएस अधिकाऱ्याला वैयक्तिकरित्या चार्टर्ड विमान प्रवास परवडू शकतो का, याबाबत शंका उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, नीलेश रामचंद्र देवरे यांची प्रशासकीय कारकीर्दही चर्चेत आली आहे. मूळचे महाराष्ट्रातील नाशिकचे रहिवासी असलेले देवरे 2011 बॅचचे बिहार कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.

त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी नवी मुंबई येथील खासगी महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मधुबनी, बांका, छपरा आणि बेतिया येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सप्टेंबर 2022 मध्ये त्यांची केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर ते पुन्हा बिहारमध्ये रुजू झाले.

या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर अद्याप नीलेश देवरे यांनी कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या प्रकरणामुळे प्रशासनातील पारदर्शकता, अधिकाऱ्यांचे विशेषाधिकार आणि सार्वजनिक निधीच्या वापराबाबतचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. आगामी काही दिवसांत सरकारकडून अधिकृत स्पष्टीकरण किंवा कागदपत्रे सादर केली जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा वाद केवळ एका प्रवासापुरता मर्यादित राहतो की व्यापक राजकीय संघर्षाचे रूप धारण करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us