मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रतिवर्षाप्रमाणे आज (23 सप्टेंबर) लालबागच्या राजाचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हेही त्यांच्यासोबत होते. यावेळी लालबाग राजा गणेश मंडळाच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी, खजिनदार मंगेश दळवी यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला. गेल्यावर्षीही अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते. (Deputy Chief Minister Ajit Pawar Absence during Amit Shah’s Mumbai visit)
अमित शाह यांची लालबागच्या राजावर विशेष श्रद्धा आहे. मागील अनेक वर्षांपासून ते नित्यनिमाने दरवर्षी गणेशोत्सवामध्ये मुंबईला येत असतात. त्याचप्रमाणे आज त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. तिथून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं दर्शन घेतले. त्यानंतर ते वांद्रे येथील आशिष शेलारांच्या सार्वजनिक गणपतीचं दर्शन घेण्यासाठी रवाना झाले. संध्याकाळी मुंबई विद्यापाठीत लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यान कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
दरम्यान, अमित शाह यांच्या या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली. आज अमित शाह यांनी त्यांच्या दौऱ्यात ‘सागर’ बंगल्यावर आणि ‘सह्याद्री अतिथीगृहात’ मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. या चर्चांमध्ये नेमके कोणते विषय होते याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र सध्याची आमदार अपात्रतेची सुनावणी, तिन्ही पक्षातील समन्वय या विषयांवर चर्चा झाली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजित पवार हे आज दिवसभर बारामतीमध्ये होते. सकाळी ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण कक्षाच्या (अपघात विभाग) उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर बारामतीमध्ये बारामती बँकेच्या वार्षिक सभेला उपस्थित होते. हा त्यांचा पूर्वनियोजित दौरा असल्यानेच अमित शाहंसोबत मुंबईत उपस्थित राहू शकले नव्हते.