मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना डेंग्यूची लागण झाली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी ‘एक्स’वरुन याबाबत माहिती दिली. अजित पवार यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती पटेल यांनी दिली. मागील काही दिवसांपासून अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे टाळण्याने त्यांच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न विचारण्यात येत होते. त्यावर पटेल यांनी त्यांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे स्पष्ट केले. (Deputy Chief Minister Ajit Pawar has been infected with dengue.)
अजित पवार यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना खासदार पटेल म्हणाले, अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित नसल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आहेत. पण, मी हे स्पष्ट करू इच्छितो की कालपासून त्यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. एकदा ते पूर्णपणे बरे झाली की, आपली सार्वजनिक कर्तव्ये निभावण्यासाठी पूर्ण ताकदीने परत येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गुरुवारी अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी शिर्डीमध्ये उपस्थित होते. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांनी शनिवारी बारामती दौराही रद्द केला होता. शनिवारी (२८ ऑक्टोबर) अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार होता. अजित पवार येणार असल्याने कार्यक्रमाची जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र मराठा समाजाचा विरोध आणि त्यांची तब्येत या दोन्ही गोष्टींमुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती पटेल यांनी दिली.