केरळमध्ये मोठा हल्ला; ख्रिश्चन धर्मीयांच्या प्रार्थना सभेत तीन शक्तिशाली बॉम्बस्फोट

केरळमध्ये मोठा हल्ला; ख्रिश्चन धर्मीयांच्या प्रार्थना सभेत तीन शक्तिशाली बॉम्बस्फोट

एर्नाकुलम : केरळमधील एर्नाकुलम येथील कलामासेरी येथे ख्रिश्चन धर्मीयांच्या प्रार्थना सभेदरम्यान तीन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सभेवेळी सभागृहात हजारो लोक उपस्थित होते. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ‘हॉलच्या मध्यभागी हा स्फोट झाला. मला तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले. मी मागे होतो. तेथे धुराचे लोट होते. एका महिलेचाही मृत्यू झाल्याचे मी ऐकले आहे. (One killed, many injured as multiple explosions rock Kerala prayer meeting)

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस होता. यात हजारो लोक प्रार्थनेसाठी जमले असतानाच सकाळी नऊच्या सुमारास हा स्फोट झाला. ज्या हॉलमध्ये हा स्फोट झाला त्याची क्षमता दोन हजार लोकांची होती. प्रार्थना सुरु असतानाच एकापाठोपाठ एक सलग तीन बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात जखमी झालेल्या 20 हून अधिक लोकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी जळालेला मृतदेह बाहेर काढला असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या बॉम्बस्फोटानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा पथकाची National Bomb Data Centre ची एक टीमही रवाना करण्यात आली आहे. त्यांनी एनआयएलाही घटनास्थळी पोहोचून घटनेची चौकशी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले, ‘ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आम्ही घटनेचा तपशील गोळा करत आहोत. एर्नाकुलममध्ये सर्व उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित आहेत. पोलीस महासंचालक घटनास्थळी जात आहेत. आम्ही हे अतिशय गांभीर्याने घेत आहोत. तपासानंतर अधिक माहिती मिळेल. सध्या एकाचा मृत्यू झाला असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

थरूर यांनीही केला निषेध :

दरम्यान, या घटनेवर केरळमधील काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, ‘केरळमध्ये एका धार्मिक सभेवर बॉम्बहल्ला झाल्याची बातमी ऐकून मला धक्का बसला. या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि तात्काळ पोलीस कारवाईची मागणी करतो. पण ते पुरेसे नाही. आपले राज्य खून आणि विध्वंसाच्या मानसिकतेला बळी पडलेले पाहून वाईट वाटते. मी सर्व धर्मगुरूंना विनंती करतो की त्यांनी अशा रानटीपणाचा निषेध करावा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube