मुंबई : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नागपूर येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणूक आयोगाचा निकाल आला आणि त्यात एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाले ही अतिशय आनंदाची बाब आहे. आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की, खरी शिवसेना हीच आहे. कारण, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्यांच्याकडे आहेत, तीच खरी शिवसेना ठरणार आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते. आमदार-खासदार यांची संख्या लक्षात घेऊनच निर्णय होतो. मतदारांची संख्या पाहूनच निर्णय होत असतो. अजून पूर्ण निकाल मी वाचलेला नाही, पण, यापूर्वीच्या निवडणूक आयुक्तांनी सुद्धा अशा प्रकरणांमध्ये अशाच आशयाचे निर्णय दिलेले आहेत.
या निकालावर आलेल्या काही प्रतिक्रियांबाबत विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निकाल बाजूने आला तर संस्था ‘फ्री अँड फेअर’ आणि विरोधात गेला तर दबावातून निर्णय अशी प्रतिक्रिया येणार हे मी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. त्यांच्या प्रतिक्रिया या ठरलेल्या असतात. ते त्यांच्या स्क्रिप्टवर चालतात. पण, या देशात लोकशाही आहे आणि संस्था या संविधानानुसार, कायद्याने आणि लोकशाही तत्त्वानेच चालत असतात.