मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना 16 दिवसांच्या उपचारानंतर आज ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील काही दिवस मुंडेना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला ब्रीच कॅन्डीच्या डॉक्टरांनी दिला आहे.
आमदार धनंजय मुंडे यांच्या कारला दि. 3 जानेवारी रोजी मध्यरात्री नंतर परळी येथे अपघात घडला होता. छातीला जखमा असल्याने त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, मंत्रिमंडळातील आजी-माजी सदस्य, खासदार, आमदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी मुंडे यांची ब्रीच कॅन्डी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दरम्यान आज धनंजय मुंडे यांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
डॉक्टरांनी मुंडे यांना पुढील काही दिवस सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. मुंबईतील निवासस्थानी काही दिवस विश्रांती घेऊन परळी येथे लवकरच सर्वांना भेटून पुन्हा जनसेवेत दाखल होणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान सक्तीच्या विश्रांतीसाठी पुढील काही दिवस सहकारी-कार्यकर्त्यांनी भेटायला येऊ नये, असे आवाहन मुंडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. या काळात उपचार केलेले सर्व डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णालयातील कर्मचारी, विचारपूस करून काळजी व्यक्त केलेले सर्व मान्यवर तसेच समर्थकांचेही धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत.