Dheeraj Pardeshi case heats up : अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात महापालिकेच्या कंत्राटी कर्मचारी धीरजसिंग परदेशी उर्फ धीरज राजपूत यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून विविध हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत.
मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा भागात काही दिवसांपूर्वी शासकीय कर्तव्य बजावत असताना धीरज परदेशी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी झालेल्या परदेशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच संपूर्ण शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
घटनेनंतर कापड बाजार परिसरासह शहरातील अनेक भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
2 हजारांवरील UPI व्यवहारांवर MDRची चर्चा, पण ग्राहकांना घाबरण्याचे कारण नाही; सरकारचे स्पष्टीकरण
दरम्यान, रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने नागरिक, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमा झाले. यावेळी आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. आमदार अक्षय कर्डिले यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तर आमदार संग्राम जगताप यांनी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत या प्रकरणातील तपास आणि कारवाईबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले.
संग्राम जगताप यांनी म्हटले की, शासकीय काम करत असलेल्या कर्मचाऱ्यावर दिवसाढवळ्या हल्ला होतो आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो, ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
या घटनेने सर्वाधिक हळहळ व्यक्त झाली ती धीरज परदेशी यांच्या कुटुंबीयांची. रुग्णालय परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी धीरज परदेशी यांच्या पत्नीने अश्रूंना वाट मोकळी करून देत, ज्या ठिकाणी माझ्या पतीला मारहाण करण्यात आली, त्याच ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करावा, अशी हृदयद्रावक मागणी केली. त्यांच्या या भावनिक मागणीने उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले.
मृत कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात होणार असून थोड्याच वेळात मृतदेह घाटी रुग्णालयाकडे रवाना केला जाणार आहे. दरम्यान धीरज परदेशी हत्या प्रकरणातील आरोपींची घरे पाडा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केली आहे. त्याच्याप्रमाणे थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन सुरू कारणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगर महानगरपालिका कामगार युनियननेही आक्रमक भूमिका घेतली आहे. युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल, सचिव आनंदराव वायकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात धीरज परदेशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत कठोर भूमिका जाहीर केली आहे.
बीडमध्ये खाद्यतेलाविरोधात एफडीएची मोठी कारवाई; 1.94 कोटींचे तेल जप्त, पाच परवाने निलंबित
युनियनच्या निवेदनानुसार, मुकुंदनगर परिसरात महापालिका कर्मचाऱ्यांना संपूर्ण सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत कोणताही कर्मचारी त्या भागात नागरी सेवा देण्यासाठी जाणार नाही. तसेच उर्वरित सर्व आरोपींना अटक होईपर्यंत महापालिकेचे कामकाज बंद ठेवण्यात येईल. सध्या सात ते आठ आरोपींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी आतापर्यंत केवळ चार आरोपींना अटक केली असल्याचा दावा युनियनने केला आहे. उर्वरित आरोपी अद्याप फरार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
कामगार संघटनेने उद्यापासून बेमुदत संपाची घोषणा केली असून शहरातील विविध नागरी सेवा ठप्प राहण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे, कचरा संकलन आणि इतर अत्यावश्यक सेवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.
सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. शहरातील वातावरण संवेदनशील असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. धीरज परदेशी यांच्या मृत्यूने अहिल्यानगर हादरले असून न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता सर्व स्तरांतून जोर धरू लागली आहे.
