मराठवाड्यात ऑगस्ट महिना पावसाअभावी (Marathwada) कोरडा गेल्याने खरीप पिकांवर संकट ओढवलं आहे. सलग 31 दिवस पावसाने दडी मारल्याने अनेक भागांतील पिके माना टाकू लागली असून शेतकरी चिंतेत आहेत. ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने उत्पादकतेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी लातूरसह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील दुष्काळसदृश भागात क्लाऊड सीडिंग म्हणजेच कृत्रिम पावसाचा प्रयोग तातडीने राबवण्याची मागणी केली आहे.
पावसाची प्रतीक्षा करण्यापेक्षा उपलब्ध वैज्ञानिक आणि तांत्रिक पर्यायांचा वापर करण्याची ही वेळ असल्याचं धीरज देशमुख यांनी म्हटलं आहे. क्लाऊड सीडिंगमुळे हमखास पाऊस पडेल, असा दावा करता येणार नाही, मात्र योग्य हवामान आणि ढगांची स्थिती असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग करून पाहता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. शेतकरी संकटात असताना सरकारकडे उपलब्ध असलेला प्रत्येक वैज्ञानिक पर्याय तपासला गेला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पावसाची प्रतीक्षा संपणार; मराठवाडा-विदर्भात जोरदार कोसळणार, काय आहे हवामान अंदाज?
धीरज देशमुख यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे सरकारचं लक्ष या प्रश्नाकडे वेधलं आहे. पावसाळ्याचे तीन महिने संपत आले तरी मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही आणि अनेक ठिकाणी पिकांची अवस्था बिकट झाली आहे, असं त्यांनी म्हटलं. लातूरच्या मांजरा धरणात केवळ 13.5% पाणीसाठा शिल्लक असल्याचा उल्लेख करत दुष्काळाचं संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. उर्वरित पावसाळ्यात ज्या भागात ढगाळ वातावरण असेल, तिथे कृत्रिम पावसाचा प्रयोग करून शेतकऱ्यांना काही दिलासा देता येतो का, याचा विचार करण्याची मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे धीरज देशमुख यांनी ही मागणी केली आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी होईल की नाही, हे निश्चित सांगता येत नसल्याचं मान्य करतानाच, शेतकरी आभाळाकडे पाहत असताना सरकारने आपल्या हाती असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करावा, असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळसदृश भागात तातडीने निर्णय घेऊन क्लाऊड सीडिंगचा प्रयोग राबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
