कांद्याच्या दरवाढीला लगाम घालण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; ‘कांदा एक्सप्रेस’ आज दिल्लीत पोहोचणार
कांद्याचे दर वाढल्याने साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असला, तरी अनेक शेतकऱ्यांकडं आता कांदा शिल्लक नसल्याचं चित्र आहे.
कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने (Farmer) ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने बाजारात बफर स्टॉकमधील कांदा उतरवण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील नाशिकमधून 800 टन कांदा घेऊन जाणारी ‘कांदा एक्सप्रेस’ बुधवारी दिल्लीत पोहोचणार आहे. हा कांदा NAFED, NCCF आणि सेंट्रल वेअरहाऊसच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना 35 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध करून दिला जाणार आहे. सध्या दिल्लीत कांद्याचा दर सुमारे 55 रुपये किलो असल्याने या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कांद्याचे दर वाढल्याने साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असला, तरी अनेक शेतकऱ्यांकडं आता कांदा शिल्लक नसल्याचं चित्र आहे. दुसरीकडं वाढत्या दराचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर होत असल्याने सरकारने बाजारातील पुरवठा वाढवण्यावर भर दिला आहे. नाशिकमधील बफर स्टॉकमधून दिल्लीसह विविध मोठ्या शहरांमध्ये कांदा पाठवला जात असून, दर नियंत्रणात आणणे आणि ग्राहकांना स्वस्त कांदा उपलब्ध करून देणं हा या मोहिमेचा उद्देश आहे.
पावसाच्या तुटीचा मराठवाड्याच्या शेतीला फटका; 3.5 लाख हेक्टर क्षेत्र घटलं, वाचा चिंताजनक आकडेवारी
दिल्लीबरोबरच चेन्नई, एर्नाकुलम, मदुराई आणि गुवाहाटी येथेही रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कांदा पाठवला जात आहे. 24 ऑगस्ट रोजी देशातील कांद्याचा सरासरी किरकोळ भाव 43.53 रुपये प्रति किलोवर पोहोचला असून, वर्षभरापूर्वी तो 27.37 रुपये होता. म्हणजेच किरकोळ दरात सुमारे 59 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरासरी घाऊक भावही वाढून 35.58 रुपये प्रति किलो झाला आहे. प्रमुख शहरांचा विचार केला तर चेन्नईत 60 रुपये, दिल्लीत 55 रुपये तर कोलकात्यात 53 रुपये प्रति किलो दराने कांद्याची विक्री झाली आहे.
बाजारातील दरवाढ रोखण्यासाठी सरकारने कांद्याचा मोठा राखीव साठा तयार ठेवला आहे. 2024-25 मध्ये बफर स्टॉकमधील कांदा रेल्वेच्या माध्यमातून विविध शहरांमध्ये पाठवण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. मागील आर्थिक वर्षात 86 रेल्वेमार्गांद्वारे 16 प्रमुख शहरांमध्ये सुमारे 88,000 टन कांदा पोहोचवण्यात आला. यंदा सरकारने सुमारे 1 लाख 21 हजार टन कांद्याचा राखीव साठा ठेवला असून, गरजेनुसार हा कांदा बाजारात आणून वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.