मुंबईच्या आमदारांच्या कामगिरीत सत्ताधारी पिछाडीवर; टॉप 5 मध्ये एकही सत्ताधारी आमदार नाही
प्रजा फाउंडेशनच्या क्रमवारीत काँग्रेसचे अमीन पटेल, अस्लम शेख आणि ज्योती गायकवाड यांनी अनुक्रमे पहिल्या तीन स्थानांवर बाजी मारली आहे.
मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा (Mumbai) आढावा घेणारा प्रजा फाउंडेशनचा ‘MLA Report Card 2026’ अहवाल जाहीर झाला असून, त्यातून सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मुंबईतील एकूण 36 आमदारांपैकी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांना अहवालातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे उर्वरित 33 आमदारांच्या कामगिरीचं प्रगतीपुस्तक या अहवालातून मांडण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या टॉप 5 आमदारांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या एकाही आमदाराचा समावेश नाही.
प्रजा फाउंडेशनच्या क्रमवारीत काँग्रेसचे अमीन पटेल, अस्लम शेख आणि ज्योती गायकवाड यांनी अनुक्रमे पहिल्या तीन स्थानांवर बाजी मारली आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे सुनील प्रभू आणि मनोज जामसुतकर हे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. भाजपच्या मनीषा चौधरी, योगेश सागर, अमित साटम आणि अतुल भातखळकर यांनी त्यानंतरची स्थानं मिळवली आहेत. त्यामुळे मुंबईतील प्रश्न विधानसभेत मांडण्याच्या बाबतीत भाजपच्या तुलनेत ठाकरे गटाचे आमदार पुढे असल्याचं चित्र अहवालातून समोर आलं आहे.
पंतप्रधान मोदींना हटवण्याच्या हालचाली, शहांसोबत कुणी काम करायला तयार नाही, राऊतांचे खळबळजनक दावे
क्रमवारीच्या दुसऱ्या टोकाला शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे शेवटच्या स्थानावर आहेत. त्यांच्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे अशोक पाटील आणि भाजपचे रामचंद्र कदम यांचा तळातील आमदारांमध्ये समावेश आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे 18 व्या क्रमांकावर असून वरुण सरदेसाई यांनी 10 वं स्थान मिळवलं आहे. याशिवाय अनंत नर, अजय चौधरी, हारुन शेख, महेश सावंत आणि सुनील राऊत यांच्यासह ठाकरे गटाच्या इतर आमदारांचाही क्रमवारीत समावेश आहे
आमदारांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न विधानसभेत कितपत पोहोचतात, हा त्यांच्या कामगिरीचा महत्त्वाचा निकष असल्याचं प्रजा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी स्पष्ट केलं. पंधराव्या विधानसभेतील 33 आमदारांच्या एकत्रित कामगिरीचं चित्र चिंताजनक असल्याचं त्यांनी म्हटलं. बाराव्या विधानसभेत आमदारांची सरासरी गुणसंख्या 61 होती, तर चौदाव्या विधानसभेत ती 54 वर आली. पंधराव्या विधानसभेत या गुणसंख्येत किंचित वाढ होऊन ती 55 झाली आहे. ही केवळ आकडेवारीतील चढउतार नसून आमदारांच्या कामगिरीचं मोजमाप असल्याचं म्हस्के यांनी नमूद केलं