१ फेसबुक पोस्ट अन् धुळ्याच्या महापौर रुग्णालयात; भाजप विरुद्ध गोरक्षक संघर्ष पेटला, नेमकं प्रकरण काय?

फेसबुकवरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे धुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Dhule Mayor Mayadevi Pardeshi And Sanjay Sharma Controversy

Dhule Mayor Mayadevi Pardeshi And Sanjay Sharma Controversy

Dhule Mayor Mayadevi Pardeshi And Sanjay Sharma Controversy: फेसबुकवरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे धुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. धुळ्याच्या महापौर मायादेवी परदेशी आणि गोरक्षक संजय शर्मा यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. शहरातील अवैध धंदे आणि कत्तलखान्यांवरून सुरू झालेल्या या वादात भ्रष्टाचाराचे आरोप, सोशल मीडियावरील टीका, घरावरील तोडफोड आणि गुन्हे दाखल होण्यापर्यंतच्या घडामोडी घडल्या आहेत. याचदरम्यान महापौर मायादेवी परदेशी यांना प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भाजप आमदार अनूप अग्रवाल यांनी महापौरांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा केला. मात्र, डॉक्टरांनी औषधांचा ओव्हरडोस घेतल्याची माहिती दिली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

कत्तलखान्यांच्या मुद्द्यावरून वादाला सुरुवात

या वादाची सुरुवात 3 नोव्हेंबरपासून झाली. भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने कत्तलीसाठी आणलेली गुरं सोडवली होती. त्यानंतर गोरक्षक संजय शर्मा यांनी धुळे शहरातील कत्तलखान्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

दुसऱ्याच दिवशी म्हणजे 4 नोव्हेंबरला शहरातील पूल कोसळण्याच्या प्रकरणावरून संजय शर्मा यांनी भाजप आमदार अनूप अग्रवाल आणि महापौर मायादेवी परदेशी यांच्यावर टक्केवारी घेतल्याचे आरोप केले. या आरोपांमुळे भाजप आणि संजय शर्मा यांच्यातील वाद अधिक वाढला.

दरम्यान, 19 नोव्हेंबरला महापौर मायादेवी परदेशी यांनी शहरातील अवैध धंदे आणि कत्तलखान्यांविरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला. प्रशासनाच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं. त्यानंतर पोलिसांनी शहरातील चार कत्तलखान्यांवर कारवाई करत ते जमीनदोस्त केले.

संजय शर्मा यांची महापौरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट

या वादादरम्यान 20 नोव्हेंबरला संजय शर्मा यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचे दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र, अटकेपूर्वी संजय शर्मा यांनी महापौर मायादेवी परदेशी यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे.

या पोस्टमध्ये दिवाळीच्या काळात महापौरांवर अतिप्रसंग आणि बलात्काराचा प्रयत्न झाल्याची तक्रार देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या पोस्टमुळे महापौरांची बदनामी झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.

या पोस्टनंतर संतप्त झालेल्या काही लोकांनी संजय शर्मा यांच्या घरात आणि दुकानांमध्ये तोडफोड केल्याचा आरोप आहे. संजय शर्मा यांच्या पत्नीने या घटनेत महापौरांचे पुत्र विकी परदेशी यांचा सहभाग असल्याचा आरोप केला. याप्रकरणी 21 नोव्हेंबरला महापौरांच्या मुलासह सुमारे 20 जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

महापौर मायादेवी परदेशी रुग्णालयात दाखल

या सगळ्या घडामोडींदरम्यान 21 नोव्हेंबरच्या रात्री महापौर मायादेवी परदेशी यांची प्रकृती बिघडली. त्यांना धुळे शहरातील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

22 नोव्हेंबरला भाजप आमदार अनूप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. संजय शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह पोस्टचा निषेध करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या मोर्चातून करण्यात आली.

यावेळी आमदार अनूप अग्रवाल यांनी महापौरांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा केला. सोशल मीडियावरील पोस्टमुळे महापौर मानसिक तणावात गेल्या होत्या, असं त्यांनी सांगितलं.

मात्र, या घटनेबाबत डॉक्टरांनी वेगळी माहिती दिली. महापौरांनी विषप्राशन केलं नसून औषधांच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांचा रक्तदाब कमी झाला आणि प्रकृती बिघडली, अशी माहिती डॉक्टरांनी दिल्याचं वृत्त आहे. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही सांगण्यात आलं.

महादेव परदेशी यांचे संजय शर्मा यांच्यावर गंभीर आरोप

महापौरांचे पती महादेव परदेशी यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले. संजय शर्मा हे गोरक्षक नसून गोतस्करीच्या नावाखाली वाहनांकडून पैसे वसूल करतात, लोकांना ब्लॅकमेल करतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात, असा आरोप त्यांनी केला.

महापौरांनी कत्तलखान्यांविरोधात आंदोलन सुरू केल्यानंतर संजय शर्मा यांनी त्यांची बदनामी करणाऱ्या पोस्ट केल्याचा दावाही महादेव परदेशी यांनी केला. या पोस्टमुळे महापौरांना मोठा मानसिक त्रास झाल्याचं त्यांनी सांगितलं.

दुसरीकडे, आमदार अनूप अग्रवाल यांनीही संजय शर्मा यांच्यावर खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप केले.

दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप; पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणात संजय शर्मा यांना ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर संजय शर्मा यांच्या घरावरील तोडफोडीप्रकरणी महापौरांच्या मुलासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकीकडे शहरातील कत्तलखाने आणि अवैध धंद्यांचा मुद्दा, दुसरीकडे भ्रष्टाचाराचे आरोप, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि घरावरील तोडफोड यामुळे धुळे शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे. आता या प्रकरणात पोलीस तपासातून काय समोर येतं आणि दोन्ही बाजूंच्या आरोपांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version