असं म्हणतात की राजकारणात कोणचं कुणाचा कायमचा शत्रू नसतं आणि कोणचं कुणाचं कायमचं मित्र नसतं. त्यामुळेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची गाठ-भेट होते, सामना वृत्तपत्रातून फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. पण या उक्तीला अपवाद आहे तो रायगडचा. रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare), मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले (Bharat Gogavale) यांचे सूर जुळणे जवळपास अशक्य आहे. रायगड जिल्ह्यात आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील वादाचा पाढा सुरूच आहे. आताही पालकमंत्रीपदावरून या दोघांमध्ये टोकाचे वाद पाहायला मिळत आहेत. दोघांनीही पालकमंत्रिपद हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. पण या दोघांमधील वादाचा हा पहिलाच अंक नाही. मागच्या सहा वर्षांपासून दोघांमध्ये सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणावरून जुंपली आहे. रायगड जिल्ह्याला आपल्या अधिपत्याखाली ठेवण्यासाठीच दोघांचीही धडपड दिसत आहे. (dispute between Minister Bharat Gogavale and MP Sunil Tatkare, Minister Aditi Tatkare is impossible to resolve)
सुनील तटकरे आणि भरत गोगावले हे दोघेही वेगवेगळ्या पक्षांमधील आणि वेगवेगळ्या आघाड्यांमधील नेते होते. त्यामुळे दोघांमधील सत्तेचा कलगीतुरा कधी रंगला नव्हता. पण या दोघांमधील संघर्ष रायगडला नवीन नाही. शिवसेनेला रायगडमध्ये रोखण्याचे, चेपवण्याचे काम तटकरे यांनी केले. त्यामुळे सेनेच्या बहुतांश आमदारांचा त्यांच्यावर आधीपासून राग होताच. अशात महाविकास आघाडी सरकारमध्ये या दोघांच्याही तलवारी एकाच म्यानात आल्या आणि वादाच्या ठिणग्यांना सुरूवात झाली. पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदिती तटकरे यांची राज्यमंत्री पदावर वर्णी लागली होती. तर तीन वेळा आमदार होऊनही शिवसेनेच्या भरत गोगावले यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे गोगावले नाराज होते.
जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असल्याने जिल्ह्याचा पालकमंत्री हा शिवसेनेचा असावा असा आग्रह तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लावून धरला होता. मात्र उध्दव ठाकरे यांनी तो न जुमानता आदिती तटकरे यांच्याकडे पालक मंत्री पदाची सुत्रे दिली. इथेच या वादाची पहिली ठिणगी पडली होती. नंतर कधी निधी वाटपावरून, कधी श्रेयवादावरून, तर कधी शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करण्यावरून वाद होत राहिले. तटकरे हे शिवसेना आमदारांच्या विकासकामांत खोडा घालत असल्याची तक्रार ठाकरेंकडे करण्यात आली होती. त्यामुळे गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या तीनही आमदारांनी पालकमंत्री हटावचा नारा दिला होता. पण उद्धव ठाकरे यांनी ही मागणी धुडकावून लावली होती.
त्यावेळी त्या वादात खुद्द शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागली. पवार आणि ठाकरे यांच्यात बैठक होऊन गोगावले आणि इतर आमदारांची नाराजी दूर झाली. पण तटकरे यांच्याशी असलेला वाद याच कारणांमुळे गोगावले हे उद्धव ठाकरे यांच्य़ापासून दूर गेले. त्यांनी थेट शिंदे यांच्या बंडात महत्वाची भूमिका बजावली. ते शिंदे यांच्या गटाचे प्रतोद झाले. पण मंत्री होण्याचे स्वप्न त्यांचे पूर्ण झाले नाही. त्यांचा मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी सूट शिवून तयार होता. पण त्यावर आता धूळ बसली आहे. अशी टिप्पणी त्यांच्यावर केली जाऊ लागली. ते अखेरपर्यंत ते वेटिंगवरच राहिले. हे दुःख एका बाजूला असताना अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. तर आदिती तटकरे कॅबिनेट मंत्री झाल्या. त्यावेळी कोणत्याही स्थितीत तटकरे या रायगडच्या पुन्हा पालकमंत्री होऊ नयेत यासाठी गोगावले यांनी जंग जंग पछाडले.
महायुतीतील पालकमंत्री पदाचे वाटप एकट्या गोगावले यांच्या आक्षेपामुळे थांबले होते. स्वातंत्र्यदिनी तटकरे यांनी ध्वजवंदन करू नये यासाठीही गोगावलेंनी विरोध केला होता. त्यातून तटकरेंना पालघरला पाठवण्यात आले. तेवढे गोगावले यांचे ऐकले गेले. अखेरीस पालकमंत्रीपद पुन्हा आदिती यांच्याकडेच गेले नाहीच. त्यांच्याऐवजी शिवसेनेच्या उदय सामंत यांच्याकडे ते पालकमंत्रीपद गेले. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान नसूनही गोगावले यांनी संयम बाळगला होता. सुनील तटकरे यांना दणका देण्याच्या तयारीला गोगावले लागले होते. त्याची संधी त्यांना लोकसभेला मिळाली. लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघावरून जागा वाटपावरून महायुतीत तणाव होता. राष्ट्रवादी काँग्रेससह, भाजप आणि शिवसेना शिंदे गटही रायगडच्या जागेसाठी आग्रही होता. तटकरेंना असलेला सुप्त विरोध यास कारणीभूत होता.
अशात गोगावलेंनी मुलाला मैदानात उतरवले. युवासेनेचे नेते असलेल्या विकास गोगावले यांना रायगड लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जाऊ लागली. मतदारसंघांमध्ये जोरदार बॅनरबाजी झाली. पण गोगावले यांना कसे थोपवयाचे याचे गणित माहीत असलेल्या तटकरेंनी रायगडची जागा मिळवली आणि विजयही संपादन केला. इथे दोघेही एकत्र येऊन नेटाने कामाला लागले होते. दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या दिलजमाईने पक्षातील कार्यकर्तेही अचंबित झाले होते. इथे वादाला फुलस्टॉप मिळेल असे वाटले असतानाच विधानसभेची निवडणूक लागली. निवडणूक पार पडली आणि हळू हळू वादाचे एक एक अंक दिसू लागले. फडणवीस सरकारमध्ये तटकरे आणि गोगावले मंत्री झाले. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असल्याने पालकमंत्री तटकरेंना मिळेल अशीच सर्वांची खात्री होती. पण इथे आदिती तटकरेंनी पालकमंत्रीपद खेचून आणले.
भरत गोगावलेंचा इगो पुन्हा दुखवला. तटकरे राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील एकमेव आमदार, तर शिवसेनेचे तीन आमदार. त्यानंतरही पालकमंत्रीपद तटकरेंकडे गेले. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत कैफियत मांडली. त्यानंतर रविवारी सुट्टीवर असलेल्या अधिकार्यांना मंत्रालयात बोलवून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली. इथेच गोगावले यांनी अर्धा डाव जिंकला. आता गोगावले आणि शिवसेना आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांनी तटकरेंची सद्दी संपवायचीच असा पण केला आहे. त्यामुळे थेट तटकरेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना ललकरण्याचे धाडस तिघांनी दाखवले. जो भावाचा होऊ शकला नाही तो तुमचा आमचा काय होणार, अशी टीका मंत्री भरत गोगावले यांनी तटकरेंवर केली.
एवढेच नाही तर हिंमत असेल तर बल्लाळेश्वराच्या समोर छातीवर हात ठेवून सांगा आम्हाला तिघांना पाडण्याचा प्रयत्न कुणी केला, असे थेट आव्हान गोगावले यांनी तटकरे यांना दिले आहे. या तिन्ही आमदारांमध्ये तटकरेंबद्दल असलेला राग बघूनच शिवसेनेला तटकरेंनी किती चेपवले असावे याचा अंदाज येऊ शकतो. आता तटकरे विरुद्ध गोगावले वादाच्या दुसऱ्या अंकाचा शेवट काय होणार? गोगावले यांना पालकमंत्रीपद दिले तर ते आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्याशी कितपत जुळवून घेतील याबद्दल तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा.