NEET Results 2026 : देशभरात नीट परीक्षेच्या (NEET) पेपरफुटीवरुन सुरू असलेला गोंधळ अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे राजधानी दिल्लीत सोनम वांगचुक यांचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषण सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढत होता. वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. दुसरीकडं नीटच्या पुनर्परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र, या निकालातून एक धक्कानदायक बाब समोर आल्याने नीट परीक्षेचा घोळ सुरूच असल्याचं दिसून येतयं.
वडवणीतील ज्ञानेश्वरी पवार या विद्यार्थिनीला नीट परीक्षेत अवघे 87 गुण मिळाले आहेत. मात्र, मी अंसर की चेक केली, तेव्हा मला 700 प्लस मार्क्स मिळतील, असा विश्वास ज्ञानेश्वरीने व्यक्त केला होता. त्यामुळेच, आपले 87 गुण पाहून तिला अश्रू अनावर झाले आहेत. बीड जिल्ह्यातील ज्ञानेश्वरीने नुकतीच पार पडलेली नीटची परीक्षा दिली होती, ही विद्यार्थिनी टॉपरच्या शर्यतीत होती. मात्र, तिला स्कोर कार्डवर केवळ 87 गुण मिळाले आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वरी आणि तिचे कुटुंब धाय मोकलून रडत असून पुन्हा एकदा नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ओ.एम.आर. शीटमध्ये तफावत असल्याचा दावाही ज्ञानेश्वरीकडून करण्यात आला आहे.
संस्थाचालकाकडून कर्मचाऱ्याच्या पतीला मारहाण; बीडमध्ये वातापरण तापलं
आधी मी नीटची परीक्षा दिली, त्यानंतर पुन्हा जास्त कष्ट घेतले आहेत. परीक्षा दिल्यानंतर मी अँसर की चेक केल्यावर मला गुण येत होते. त्यामुळे मी एम्स दिल्लीचे स्वप्न पाहिले. मात्र, मार्कशीटवर केवळ 87 मार्क दिसल्याने धक्काच बसल्याचं विद्यार्थिनींने म्हटलं आहे. माझ्या मुलीला चुकीची ओएमआर शीट देण्यात आली असा आरोप ज्ञानेश्वरीच्या आईने देखील केला आहे. लेकरांनी 18-18 तास अभ्यास करून ही परिस्थिती आहे. मुलींने जेवण केलं नाही पण अभ्यास केला अशी वर्षभर परिस्थिती होती. त्यामुळे, माझ्या मुलीला 700 मार्क पडायला पाहिजे होते असेही ज्ञानेश्वरीच्या आईने म्हटलं आहे.
त्याचबरोबर, ओ.एम.आर शीट आम्हाला लाईव्हमध्ये दाखवा, अशी मागणी देखील ज्ञानेश्वरीच्या आई मीरा पवार यांनी केली आहे. दरम्यान, बीडमध्ये अशाच पद्धतीचा आणखी एक प्रकार समोर आला असून बीडच्या सोहम गवतेच्या कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. सोहमने उत्तरपत्रिका आणि अँसर की तपासल्यानंतर 522 गुण मिळतील, अशी खात्री त्याला होती. मात्र, सोहमच्या स्कोअरकार्डवर अवघे 95 गुण दिसले. निकाल पाहिल्यानंतर काहीवेळ तो कोणाशीच बोलला नाही आणि घरात अश्रूंचा बांध फुटला. त्यामुळे, पुन्हा एकदा नीट परीक्षेच्या घोळावरुन प्रशचिन्ह उपस्थित झालं आहे.
