Kavita Gitte : बीड जिल्ह्याचे नाव अनेकदा दुष्काळ, स्थलांतर, सामाजिक प्रश्न आणि राजकीय संघर्षांच्या निमित्ताने चर्चेत येते. कधी स्त्री भ्रूण हत्या, कधी गर्भपात, गर्भपिशवी काढणे, बालविवाह अशा सामाजिक कारणांसह गुन्हेगारी आणि प्रशासकीय पातळीवरील अनियमितता तसेच कायदा आणि सुव्यस्थांच्या घटना जिल्ह्याला अगदी देशपातळीवर चर्चेत आणतात. पण, कतृत्व, संघर्ष, धाडसातून जिल्ह्याचे नाव देशपातळीवर झळकावणाऱ्या हिऱ्यांचीही बीड जिल्हा खाण असल्याचे अनेक उदाहरणांवरुन समोर येते. असेच जिल्ह्यातील केज येथील प्रा. डॉ. कविता गित्ते – कराड यांनी ऊसतोड मजूरांची मुले, बालविवाह विरोधी चळवळीसह शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामांची दखल घेत त्यांची राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्रातील चार शिक्षकांची या पुरस्कारसाठी निवड झाली. यामध्ये जिल्ह्यातील डॉ. कविता गित्ते यांच्यासह लातूर जिल्ह्यातील वैभव सुर्यवंशी तसेच नाशिकच्या कुंदा बच्छाव, साताराचे शिवप्रसाद टिंगरे या चार शिक्षकांना शिक्षक दिनी दि. पाच सप्टेंबर रोजी राष््रटपतींच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या पुरस्काराच्या निमित्ताने बीडच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, भाजपचे नंदकिशोर मुंदडा, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. नरेंद्र काळे आदींसह जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.
या कामांसाठी पुरस्कारासाठी निवड
केज येथील साने गुरुजी शाळेच्या मुख्याध्यापिका असलेल्या डॉ. कविता गित्ते – कराड दोन कला आणि वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर पदवीधारक असून त्यांनी शिक्षण शास्त्र पदविका, शिक्षण शास्त्र पदवी, शिक्षण शास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी, एम. फिल, पीएच. डी. डिलीट तसेच पत्रकारितेच्या पदवी व पदविका मिळविल्या आहेत. त्यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण क्षेत्रात केलेले काम, शाळेला आयएएसे आमानंकन, माझी शा।ळा सुंदर शाळा उपक्रम, बालविवाह निर्मुलन चळवळीतील काम, ऊसतोड मजूरांबाबतचे लेखन, विद्याथर्यांच्या क्रिडा गुणांना प्रोत्साहन आदी कामांची दखल घेत त्यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली.
या मंडळींनीही गाजविले जिल्ह्याचे नाव
जिल्ह्याचे भूमिपुत अन्न व औषधी प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी खात्यांतर्गत घेतलेल्या भेसळखोरीच्या निमित्ताने आणि त्यांच्या कारवायांनी जिल्ह्याचे नाव पुन्हा चर्चेत आलेले आहे. या शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील रोहन बहिर या विद्याथर्याच्या धाडसाची कथा सहावीच्या अभ्यासक्रमात प्रसिद्ध झाली आहे. त्यालाही काही वर्षांपूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते बालशौर्य पुरस्कार मिळाला होता. यासह सैन्यदालत असलेल्या अविनाश साबळे यानेही खेळाच्या माध्यमातून जिल्ह्याचे नाव अंतरराष्ट्रीय पातळीवर पोचविले. कलेच्या क्षेत्रात पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांनी पखवाज वादनाच्या माध्यमातून बीडचे नाव देशभर पोहोचविले. त्यांना मिळालेला पद्मश्री हा बीड जिल्ह्याला मिळालेल्या मोठ्या राष्ट्रीय सन्मानांपैकी एक ठरला. नाट्य क्षेत्रात वामन केंद्रे यांनी बीडच्या ग्रामीण मातीतून राष्ट्रीय रंगभूमीपर्यंतचा प्रवास केला. दरडवाडी या ग्रामीण भागातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिग्दर्शनाच्या क्षेत्रात देशपातळीवर पोहोचला आणि पद्मश्रीने त्यांच्या कार्याची दखल घेतली. समाजसेवेच्या क्षेत्रात सय्यद शब्बीर ‘मामू’ यांनी निरपेक्ष गोसेवेचे व्रत स्वीकारत शेकडो गायींची सेवा केली. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्रीने गौरविण्यात आले.
क्रीडा क्षेत्रात राहुल आवारे यांनी कुस्तीच्या आखाड्यातून बीडचे नाव उज्ज्वल केले. मूळचे पाटोदा तालुक्यातील असलेल्या आवारे यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवत अर्जुन पुरस्कारही पटकावला. जिल्ह्यातील संजय बांगर अंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीकेट खेळले तर संजय धस यांनीही याच क्षेत्रात आपली छाप पाडली. मुहम्मद नुबेरशहा शेख यानेही चेस खेळात अंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नाव झळकविले. आणि शिक्षणाच्या क्षेत्रात तर बीडने अलीकडच्या काळात वेगळीच छाप निर्माण केली. शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके या बीडच्या दोन शिक्षकांना २०२२ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. नाविन्यपूर्ण अध्यापन, तंत्रज्ञानाचा वापर, लोकसहभाग आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी त्यांनी केलेल्या प्रयोगांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली.
बीडची ओळख बदलण्याची गरज
एखाद्या जिल्ह्याची ओळख केवळ सरकारी अहवालांतील आकडे, दुष्काळाच्या बातम्या किंवा राजकीय संघर्षांनी ठरत नाही. त्या जिल्ह्यातील माणसे काय निर्माण करतात, किती संघर्ष करतात आणि आपल्या कामातून किती मोठा आदर्श उभा करतात, यावरही त्या भूमीची ओळख ठरते. कविता गित्ते असोत, शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके असोत; शंकरबापू आपेगावकर, वामन केंद्रे, सय्यद शब्बीर मामू असोत किंवा राहुल आवारे, अविनाश साबळे, नुबेरशहा शेख, संजय बांगर अशा प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात बीडची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हीच मंडळी बीडच्या सकारात्मक चेहऱ्याची खरी ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. बीडबद्दल नकारात्मक बाबींची चर्चा होणे अपरिहार्य असेल; कारण जिल्ह्यापुढे अनेक प्रश्न आहेत. पण त्या प्रश्नांइतकाच या भूमीतील संघर्ष, जिद्द आणि कर्तृत्वाचा इतिहासही मोठा आहे. म्हणूनच बीडची चर्चा आता केवळ प्रश्नांसाठी नव्हे, तर प्रश्नांवर मात करून देशाच्या सर्वोच्च व्यासपीठावर पोहोचणाऱ्या माणसांसाठीही व्हायला हवी. डॉ. कविता गित्ते यांच्या राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराच्या निवडीने बीडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
