अजितदादांनी बीडकरांना दाखवलेल्या विकासस्वप्नांची वीट चढतेय; ‘सी-ट्रिपलआयटी’ची गतीने उभारणी
CIIIT project : बीड जिल्ह्यातील तरुणांच्या कौशल्याला तंत्रज्ञानाची जोड देणारा ‘सी-ट्रिपलआयटी’ प्रकल्प आता प्रत्यक्ष आकार घेत आहे.
दत्ता देशमुख
Late Deputy CM Ajit Pawar CIIIT Project in Beed : विशिष्ट राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हाती घेतले. बीड (Beed) जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख पुसून त्याला विकासाच्या नव्या वाटेवर नेण्याचे स्वप्न घेऊन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्रिपदाच्या काळात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना दिली. विमानतळ, तारांगण, ‘सी-ट्रिपलआयटी’ (CIIIT) यांसारख्या प्रकल्पांसोबतच तब्बल पाच दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या नगर-बीड रेल्वेसाठीही त्यांनी पुढाकार घेतला. त्यापैकी जिल्ह्यातील तरुणांच्या कौशल्याला तंत्रज्ञानाची जोड देणारा ‘सी-ट्रिपलआयटी’ प्रकल्प आता प्रत्यक्ष आकार घेत असून, अजित पवारांनी दाखविलेल्या विकासाच्या स्वप्नातील महत्त्वाचा टप्पा वेगाने पुढे सरकत आहे.
शिवसेना-धनुष्यबाण वादात ठाकरे गटाचा अंतिम युक्तिवाद; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत मोठ्या घडामोडी
या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे सात हजार विद्यार्थ्यांना कौशल्याधारित आणि जॉब ओरिएंटेड प्रशिक्षण मिळणार आहे. विविध उद्योगांना आवश्यक असलेले ट्रेड, तांत्रिक कौशल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण येथे दिले जाणार आहे. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. प्रशिक्षणानंतर तरुणांना टाटा समूहातील विविध कंपन्यांसह नजीकच्या औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरातील औद्योगिक वसाहतींना आवश्यक असलेल्या मनुष्यबळानुसार प्रशिक्षण दिले जाणार असल्याने बीडच्या तरुणांना जिल्ह्याबाहेर रोजगारासाठी भटकंती करण्याऐवजी कौशल्याधारित संधी मिळू शकतात. बीड जिल्ह्यात शेतीवरील अवलंबित्व, मर्यादित औद्योगिकीकरण आणि रोजगाराच्या अपुऱ्या संधींमुळे मोठ्या प्रमाणावर तरुणांना पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगरसह अन्य शहरांकडे स्थलांतर करावे लागते. अनेक कुटुंबे ऊसतोडणीच्या हंगामावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत तांत्रिक शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगार यांना एकाच व्यासपीठावर आणणारा ‘सी-ट्रिपलआयटी’ प्रकल्प जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
दिवंगत अजित पवार हे सरकारचा प्रमुख भाग असल्याने त्यांच्या विकास संकल्पनांची प्रत्यक्ष तांत्रिक आणि प्रशासनिक अंमलबजावणीलाही मोठी गती होती. याच धर्तीवर जिल्ह्यातील तरुणांना कौशल्याधारित शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात, स्थानिक पातळीवर कुशल मनुष्यबळ तयार व्हावे आणि औद्योगिक विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने त्यांनी टाटा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मराठवाड्यातील पहिला ‘सी-ट्रिपलआयटी’ प्रकल्प हाती घेतला. जिल्हा प्रशासन, जिल्हा नियोजन विभाग आणि उद्योग विभागाच्या माध्यमातून आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टाटा टेक्नॉलॉजीने त्यांच्या एका पत्रावर लागलीच होकार दिला आणि त्यानंतर प्रकल्पाला गती मिळाली.
राज्य सरकार आणि टाटा टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभारला जात आहे. प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 197 कोटी रुपये असून, राज्य सरकारकडून 33 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. उर्वरित निधी टाटा टेक्नॉलॉजीकडून उभारण्यात येणार आहे. शहरातील एमआयडीसी परिसरात एक एकर जागेवर ‘सी-ट्रिपलआयटी’ सेंटर उभारले जात असून 5,500 चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम गतीने होत आहे. नुकतेच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच टाटा टेक्नॉलॉजी व उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेत याचा आढावाही घेतला.
संगणक संच, रोबोटिकही आले
या ‘सी-ट्रिपलआयटी’ केंद्रात रोबोटीकच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठीचे संगणक संच तसेच रोबीटीक हे तांत्रिक साहित्य देखील उपलब्ध झाले आहे. या ठिकाणी जॉब ओरिएंटेड 18 ट्रेड शिकवले जातील, यासाठी नऊ अद्यायवत लॅब असतील.
“या महत्वकांक्षी प्रकल्पामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. उभारणीचे काम गतीने सुरु आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या वाटचालीत हा महत्त्वाचा प्रकल्प असून याची उभारणी गतीने सुरु आहे.” अशी भावना बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केली.